नागपूर : कोरोना महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या बाधिताच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह निधी देण्यात येत आहे. शासनाच्या या निर्णयाची आजपासून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा व महापालिका यंत्रणेला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत दिले.
नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करावे. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांनी सेतू केंद्राची मदत घ्यावी, आपला अर्ज दाखल केल्यानंतर लगेच आपल्याला मदत मिळेल, अशी ग्वाही आयुक्त लवंगारे यांनी बैठकीनंतर दिली आहे.
कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या निकटतम नातेवाईकांना तातडीची मदत देण्यासाठी राज्य शासन सज्ज झाले आहे. आजपासून जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्रावर हे अर्ज दाखल केले जातील. महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्र तसेच महापालिकेच्या दहा झोनमध्ये विशेष केंद्र यासाठी उघडण्यात येणार आहेत. झोनल ऑफिसमध्ये ही व्यवस्था केली जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सेतू केंद्रावर कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना सौजन्याने हे अर्ज भरून देण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. अतिशय सोपी माहिती अर्जात द्यावी लागणार आहे.
जिल्हा व महानगर पालिका प्रशासनाकडे कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नोंदी आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या नोंदी यापूर्वी झालेल्या आहेत त्यांना तातडीने राज्य शासनामार्फत मदत केली जाणार आहे. ज्यांच्या मृत्यू दाखल्यावर ( डेड सर्टीफिकेटवर ) डॉक्टरांनी कोविडमुळे मृत्यू लिहिले आहे. त्यांना देखील तातडीने मदत केली जाणार आहे. ज्यांच्या डेड सर्टिफिकेट व अन्य कागदपत्रांमध्ये काही समस्या आहेत या संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती तातडीने याबाबत निर्णय घेईल, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
जिल्ह्यात काही असामाजिकतत्त्व असाह्य नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थ एजंटच्या मागे न लागता थेट सेतू केंद्राला संपर्क साधावा. सर्व सेतू केंद्राच्या चालकांना कोरोना संदर्भातील अर्ज सौजन्याने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच एजंट या ठिकाणी आल्यास त्याबाबत पोलिसांना अवगत करण्याचेही बजावण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थांच्या मागे न लागता नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कालच्या बैठकीला विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी विमला आर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या संकेतस्थळावर अर्ज करा कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार रुपयांचे सहाय्य मिळणार आहे. त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. यासाठी राज्य शासनाने http://mahacovid19relief.in ( महाकोविड19 रिलीफ डॉट इन ) संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज करण्याचे आवाहन आहे.