नागपूर : कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर मनपानं आरोग्य सुविधा बळकट करण्याकडं लक्ष केंद्रित केलंय. प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे आरोग्यविषय सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येतंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या श्री जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीमध्ये मनपाचे अत्याधुनिक 199 बेड्सचे कोव्हिड हॉस्पिटल उभारण्यात आलेत. मनपाच्या या कोव्हिड हॉस्पिटलची शुक्रवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी पाहणी केली.
विद्यापीठातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालन करणाऱ्या आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्थानतर्फे सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येईल. औषधालय (फार्मसी), पेंट्री आदी व्यवस्था सुद्धा या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये असेल. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर हे हॉस्पिटल आहे. येथे लिफ्टची सोय आहे.
हॉस्पिटलमध्ये एकूण 199 बेड्स आहे. यामध्ये नवजात शिशू, 15 वर्षापर्यंतची मुले आणि इतर अन्य नागरिकांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. नवजात शिशूंसाठी 20 बेड्स पीआयसीयू चे तर 15 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी 30 बेड्स पीआयसीयूचे असतील. 50 बेड्सचे हे ऑक्सिजनचे व अन्य बेड्स सामान्य असतील. लहान मुलांना खेळण्यासाठी वेगळी जागा, मुलांच्या पालकांसाठी प्रतीक्षागृह, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट व अन्य आवश्यक सुरक्षा साहित्यांच्या वापराकरिता स्वतंत्र कक्षाची व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली आहे.
याशिवाय 90 ऑक्सिजन सिलिंडरची स्वतंत्र व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे. पहिल्या माळ्यावर रिसेप्शन काउंटरवर रुग्णाची नोंद झाल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल. त्यानंतर रुग्णावर आवश्यक पुढील करण्यात येईल. विशेष म्हणजे, विद्यापीठाच्या इमारतीच्या मागील बाजूनेसुद्धा प्रवेश व बाहेर जाणे शक्य असल्याने या कोव्हिड हॉस्पिटलमुळं नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय कामामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होऊ शकणार नाही. कोरोनाच्या संकटात शहरवासीयांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी विद्यापीठाने त्यांच्या इमारतीतील तील मजले देणे ही बाब राष्ट्रसंतांचा मानव सेवा या संदेशाचे पालन करण्याचे द्योतक आहे, असेही महापौर तिवारी म्हणाले.
कोरोनाची यापूर्वीची संभाव्य लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे पुढे येताच मनपाद्वारे विद्यापीठात कोव्हिड हॉस्पिटलची निर्मिती करण्याची संकल्पना पुढे आली. सर्व प्रक्रियेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी उत्तम सहकार्य केले. या हॉस्पिटलचे कार्य सुरूच होते. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंटचा शिकराव होत असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता हॉस्पिटलचे काम त्वरित पूर्ण करण्यात आले आहे.