नागपूर : मनपाच्या परवानगीविना गुलमोहर, बादाम आणि कडूलिंबाच्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. या प्रकरणी रामदासपेठ येथील क्रिम्स हॉस्पिटल (KRIMS Hospital) विरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात FIR नोंदविण्यात आली आहे.
शनिवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी मनपा आयुक्तांना सदर प्रकार लक्षात आला. त्यांनी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे व उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांना हॉस्पिटल परिसरातील झाडांची पाहणी करण्याचे निर्देश दिले. पाहणीनंतर उद्यान निरीक्षक अनंत नागमोते यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवली.
हॉस्पिटल परिसरातील गुलमोहर, बादाम आणि कडूलिंबाच्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आलेल्या आहेत. यासंबंधी मनपाची परवानगी घेण्यात आली नसल्याची बाब पुढे येताच त्याची माहिती आयुक्तांना देण्यात आली. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हॉस्पिटलविरोधात एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उद्यान निरीक्षकांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर नोंदविली.
नागपूर मनपा क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत साडेपाच हजार झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती अधिकारात मिळाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात उद्यान विभागाकडं यासंदर्भातली माहिती मागितली होती. मागील पाच वर्षांत पाच हजार 541 झाडे कापण्यात आली. यातील 267 झाडांवर विनापरवाना कुऱ्हाड पडली. एक जानेवारी 2020 ते 30 ऑगस्ट 2021 या कालावधीत सर्वाधिक झाडे कापण्यात आली. मनपाने एका झाडाची किंमत पाच हजार 706 रुपये लावली. मनपानं या झाडांना कापण्याची परवानगी देताना तीन कोटी 95 लाख 750 रुपये रक्कम डिपॉझीट म्हणून घेतली. 2017 ते 2020 या कालावधीत हजारो ट्रीगार्डही लावण्यात आले. यासाठीही सव्वा कोटीचा खर्च करण्यात आला.
सीताबर्डी परिसरातील भिडे मार्गावरील पिंपळाचे झाड कापण्याची परवानगी मागण्यात आली होती. याची मनपाच्या उद्यान विभागानं जाहिरात प्रकाशित करताच अनेक पर्यावरण प्रेमींनी या झाडाला तोडण्यासाठी विरोध दर्शविला. नर्सिंग कॉलेजच्या संचालिका नीलिमा हारोडे यांनी उद्यान अधीक्षकांना पत्र लिहून झाड तोडण्यावर आक्षेप घेतला. राज्यभरातून मनपाच्या मेलवर पुरातन झाड तोडण्यावरून आक्षेप नोंदविला. जमीनमालक घनश्याम पुरोहित यांनी झाड वाचविण्यासाठी होत असलेला विरोध बघीतला. त्यानंतर त्यांनी मोबदला मिळाल्यास ही जागा सोडण्याची तयारी दर्शविली. रेडिरेकनरच्या दरानं जमिनीचा मोबदला मिळावा, अशी पुरोहित यांनी मागणी आहे.