नागपूर : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं साऱ्यांची झोप उडविली. शासन-प्रशासन कामाला लागले. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी मेडिकल तज्ज्ञांसोबत चर्चा केली. गरज पडल्यास ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी उत्पादकांना कामाला लावले. आता जिल्ह्यातील 10 ते 12 कारखान्यातून रोज 160 मेट्रिक टन ॲाक्सिजनचं उत्पादन सुरू झालंय. मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये 1100 ऑक्सिजन सिलिंडरसुद्धा उपलब्ध आहेत. शिवाय 450 बेड्सची उपलब्धता आहे.
मनपाकडे नागपूर शहरात विदेशातून प्रवास करून आलेल्या 101 प्रवाशांची नोंद आहे. या सर्व प्रवाशांची चाचणी करून त्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे. मनपाकडे असलेली आरोग्य सुविधा यासंदर्भात शुक्रवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी आढावा घेतला. राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार शहरात दाखल होणार्या विदेश प्रवासाची पार्श्वभूमी असणार्या प्रवाशांविषयीची नियमावली राबविली जात आहे. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी 5 डिसेंबरला दाखल होणार्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेविषयी मनपाद्वारे करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
5 डिसेंबर रोजी सकाळी 6.45 वाजता नागपूर शहरात शारजा येथून आंतरराष्ट्रीय विमान दाखल होणार आहे. या विमानाने येणार्या प्रवाशांमध्ये ओमिक्रॉनचा धोका असलेल्या देशातील प्रवासी पार्श्वभूमी असलेल्या प्रवाशांना आधीच अधोरेखित करण्यात येणार आहे. त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय प्रवाशांची विमानात बसण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी केली जाते. त्यानंतर निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच विमानात प्रवेश दिला जातो. विमानातून उतरल्यानंतरसुद्धा पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांना गृहविलगीकरणाची परवानगी दिली जाईल. गृहविलगीकरणादरम्यान मनपाची चमू दुसर्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी संबंधित प्रवाशाच्या घरी भेट देऊन त्यांची माहिती घेत राहणार आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या बेड्स, औषध आणि ऑक्सिजन पुरवठ्याबाबतचा महापौरांनी आढावा घेतला. पुरेसा औषधसाठासुद्धा उपलब्ध आहे. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, एम्स, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रुग्णसंख्या 50 टक्केपर्यंत आल्यास मनपामध्ये आरोग्य कर्मचारी संख्यासुद्धा वाढविण्यात येईल, अशी माहिती डॉ. संजय चिलकर यांनी दिली.