नागपूर: चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल यांचा विजय ही महाविकास आघाडीला मिळालेली चपराक आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले म्हणजे विजय निश्चित होतो असं नाही. राजकारणात फक्त गणितच नाही केमिस्ट्रीही चालते, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. तीन पक्ष एकत्र आल्यावर विजय होतोच असं नाही. या निकालाने ते सिद्ध केलं आहे. राजकारणात केवळ गणितं चालत नाहीत. तर राजकीय केमिस्ट्री चालते, असं फडणवीस म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. माझे सहाकरी चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठा विजय मिळाला. मी स्वत: निवडून आलो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता. त्यापेक्षा आजचा आनंद मोठा आहे. या विजयाने इथल्या महाविकास आघाडीला चपराक दिली आहे, असं त्यांनी सांगितलं.
अकोल्यात वसंतराव खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. एकूण विधान परिषद निवडणुकीत चार जागी भाजप विजयी झाला आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सर्व प्रकारचा विजय होऊ शकतो हे गणित चुकीचं आहे स्पष्ट केलं आहे. जनता भजापच्याच पाठी आहे. भविष्यातही जनतेचा भाजपला आशीर्वाद मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
बावनकुळेंचा विजय भविष्यातील विजयाची नांदी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्यावर विश्वास ठेवून चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, अमरिश पटेल आणि वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली. तसेच नितीन गडकरींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुका लढलो. त्यात आम्हाला निर्णायकी विजयी मिळाला. आता ही विजयाची सुरुवात आहे, असा दावाही त्यांनी केला. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही महापालिकेची तयारी केली आहे. भाजप महापालिका निवडणुका चांगल्या फरकाने विजयी होईल. भाजपच महापालिकेत नंबर एकचा पक्ष होईल, असंही त्यांनी सांगितलं.
नागपूर आणि अकोल्यात महाविकास आघाडीची मते आम्हाला मिळाली. महाविकास आघाडीच्या मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला. ज्यांनी आम्हाला मते दिली. त्यांचे मनापासून आभारी आहोत, असंही ते म्हणाले. काँग्रेसच्या उमेदवाराला एकच मत मिळालं आहे. खरे तर ते काँग्रेसमध्ये गेले ही त्यांची पहिली चूक होती. तिथे गेल्यावर त्यांची जी अवस्था झाली त्यामुळेच त्यांनी काँग्रेसलाही मत दिलं नाही, असा टोला त्यांनी लगावला.
बावनकुळे हे दोन वर्ष संसदीय राजकारणात नव्हते. पण ही पार्टीत गॅप नव्हती. ही लेजिस्लेटिव्ह गॅप होती. बावनकुळेंकडे महासचिवपद हे महत्त्वाचं पद होतं. त्याचा हा कमबॅक म्हणजे नेव्हर गो बॅकवाला कम बॅक आहे. बावनकुळेंच्या विजयाने विदर्भातील मोरल वाढलं आहे. आम्ही दोन्ही जागा जिंकलो. त्याचा फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
MLC Election: छोटू भोयर यांना फक्त एकच मत, एकेकाळच्या भाजप नेत्यांवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया