नागपूर: मालाड येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. त्याला भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. भाजपचे मुंबई महापालिकेतील (bmc) नेते या मुद्द्यावरून आक्रमक झाल्यानंतर शिवसेनेनेही टिपू सुलतानच्या नावाला विरोध केला आहे. महापालिकेतील या वादात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उडी घेतली असून टिपू सुलता यांचं नाव उद्यानाला देण्यास तीव्र विरोध केला आहे. हिंदुंचा अनन्वित छळ करणारा टिपू सुलतान हा देश गौरव होऊच शकत नाही. त्यांचं नाव उद्यानाला देणं अयोग्य ठरेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिका टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देऊन त्यांचं महिमामंडन करत आहे. हे त्वरीत थांबवलं गेलं पाहिजे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विरोध केला. ज्या टिपू सुलतानानेने हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही. त्यांचं नाव मैदानाला देणं अयोग्य आहे. अत्याचार करणाऱ्याचं महिमामंडन करण्याचं काम होत आहे. हा निर्णय रद्द केला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि देशाची प्रगती यावरही भाष्य केलं. मोदींच्या नेतृत्वात देश पुढे चालला आहे. शेवटच्या माणसाचा विचार करणारं हे सरकार आहे. हे सरकार देशाला प्रगतीच्या शिखरावर नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मालाड येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यात आलं आहे. या उद्यानाचं उद्घाटन पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते होणार आहे. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. टिपू सुलतानने हिंदूंचा छळ केला. अशा हिंदूद्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव मालाडमधील उद्यानाला देण्याचा घाट मालाडचे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी अनधिकृतपणे घातला आहे. महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये ‘वीर टिपू सुलतान उद्याने’ उभी राहतायत. यावरून सत्तेसाठी शिवसेना ‘लाचारसेना’ झाली असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाषणात बोलतात तर त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातच हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या आक्रमकांचे उदात्तीकरण केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची समृद्ध परंपरा असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा धर्मांध प्रवृत्ती फोफावताना दिसत आहेत. स्थानिकांनी या नामकरणाला विरोध केला असतानाही आमची हिंदुत्वाची भूमिका कायम असल्याच्या वल्गना करणाऱ्या शिवसेनेने मात्र, यावर सोयीस्कररीत्या मौन बाळगले आहे, अशी टीकाही शिंदे यांनी केली आहे.
उद्यान महाराष्ट्र शासनाचे, कार्यक्रम मुंबईच्या पालकमंत्र्यांचा? नामकरणाचा कुठलाही ठराव नाही? नामकरणाला कोणाचीही मान्यता नाही, मग हे नामकरण कसे होते आहे? ही मोगलाई आहे काय? हिंदूंची कत्तल करणाऱ्यांचा उदोउदो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान्य आहे काय? की, ते मतांच्या लाचारीसाठी चिडीचूप आहेत काय? असा सवाल स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी दिला.
संबंधित बातम्या:
कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये, मी जाणीवपूर्वक सांगतोय, फडणवीस का संतापले?
काय सांगता ? जांभूळ उत्पादकांनाही मिळणार अनुदान, पण कशासाठी? वाचा सविस्तर