नागपूर : विधिमंडळाचं हिवाळी अधिनेशन उद्यापासून सुरु होतंय. या अधिवेशनाच्या आधी राज्य सरकारचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे अधिवेशन तीन आठवड्यांचं घेण्यात यावं, अशी मागणी केलीय. त्यांच्या या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल शब्दांत उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर अनेक मुद्द्यांवरुन टोले लगावले आहेत. त्यांच्या या टीकेला विरोधकांकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
“अजित दादा म्हणाले हिवाळी अधिवेशन तीन आठवड्याचं का नाही? आमची तर चार आठवड्याचं अधिवेशन करायलाही तयारी आहे. पण हा प्रश्न कुणी विचारायचा? ज्यांनी एक आठवड्याचं अधिवेशन तरी घेतलं असेल त्यांनी विचारायचं. ज्यांनी एकही आठवड्याचं अधिवेशन घेतलं नाही त्यांनी ते तीन आठवड्याचं अधिवेशन का नाही घेत? असं विचारतात”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“काही हरकत नाही. इथे येऊन विदर्भातील हवेने त्यांना अतिशय प्रसन्न वाटल्यामुळे आणखी एक महिना राहण्याची इच्छा असेल तर मुख्यमंत्री त्यांची ती इच्छा सुद्धा पूर्ण करतील. हा विश्वास मी व्यक्त करतो”, असं मिश्लिक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“या अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्यातील मागास भागातील प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा होईल. आम्हाला चर्चा करु. विरोधकांना गोंधळ घालायचा असेल तर आम्ही चर्चेसाठी आग्रही असू. कारण इथे चर्चा झाली पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच या अधिवेशनाला विरोधी पक्षाच्या प्रश्नाला अभ्यासपूर्ण उत्तर देऊ, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचा हिवाळी अधिवेशनावरुन विरोधकांवर निशाणा
“मी सर्वांचे स्वागत करतो. तीन वर्षांनी त्यांना नागपुरात येण्याची संधी मिळाली. आमचं सरकार आलं नसतं तर कदाचित याही वर्षी नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने कोरोना आला असता. आणि हे अधिवेशन झालं नसतं”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
“मला आज अतिशय आनंद वाटला की, अजित दादांना विदर्भाची आठवण आली. मुंबईत कोरोना नव्हता त्यामुळे अधिवेशन व्हायचं आणि नागपुरात कोरोना होता म्हणून अधिवेशन होत नव्हतं, अशी विडंबना आपण मागच्या काळात बघितलीय”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विरोधकांच्या महापुरुषांच्या अपमानाबद्दलच्या आरोपांवरील टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर
“अन्यायाची मालिका ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुरु झाली”, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली.
“महापुरुषांच्या अपमानाबद्दल त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. मला आश्चर्य वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावा मागणारे हे मांडीला मांडी लावून बसतात आणि महापुरुषाच्या अपमानाबद्दल बोलतात. वारकरी संतांबद्दल अतिशय हीन दर्जाने बोललं जातं. त्यांना मंचावर घेऊन हे महापुरुषांच्या अपमानाबद्दल बोलतात”, असा टोला त्यांनी लगावली.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे देखील मान्य नाही. या संदर्भात बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाहीय. महापुरुषांचा अपमान कुणीही करु नये. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. पण त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर द्यायला तयार आहोत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सीमावादावरु विरोधकांवर निशाणा
“हे सरकार आल्यानंतरच जणू काही सीमावाद सुरु झाला, अशाप्रकारे बोललं जातंय. खरंतर जतच्या गावांनी आम्हाला कर्नाटक जायचंय असा ठराव 2013 साली केला, जेव्हा यांचं सरकार होतं तेव्हा केलं होतं. त्यानंतर 2016 साली 77 गावांना आपण पाहोचवलं. आणि उर्वरित गावांना पाणी पोहोचवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“गावांना इतर राज्यात जाण्याचे सूर कोणी उमटवले याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. त्याबाबत आम्ही योग्य वेळी माहिती देऊ. काही पक्षाचे नेते बैठका घेऊन आपण दुसऱ्या राज्यात जाऊ, असा ठराव करु, असं म्हटले”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.