नागपूर : महाविकास आघाडी सरकार बाबासाहेबांच्या साहित्य छपाई धोरणाबाबत नकारार्थी असल्याची टीका भाजपाचे प्रदेश सचिव अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे. सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर याचा महापरिनिर्वाण दिन आहे. तरीही बाबासाहेबांच्या साहित्य छपाईच्या धोरणाबद्दल राज्य सरकार उदासीन असल्याचं मेश्राम म्हणाले. नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण दिनापर्यंत बाबासाहेबांच्या साहित्यांच्या छपाई संदर्भातील अडथळे दूर करणं आवश्यक होतं. परंतु, त्रुटी दूर करून शासनाने योग्य व सकारात्मक निर्णय घेतला नाही. बाबासाहेबांना खरी आदरांजली राज्य सरकार वाहू शकले नाही, असंही ते म्हणाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने साहित्य प्रकाशनामध्ये येत असलेल्या मनुष्यबळाचा अभाव आणि यंत्रसामुग्रीची अडचण तत्काळ प्रभावाने दूर करावी, अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य प्रकाशनासंबंधी पुढाकार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार, 5 कोटी 45 लाख रुपयांचा कागद खरेदी करण्यात आला. मात्र, 2019 मध्ये सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीनं बाबासाहेबांच्या साहित्याप्रती कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळं तो कागद खराब होण्याच्या मार्गावर असल्याचं मेश्राम म्हणाले.
साहित्य छपाईसंबंधी महाविकास आघाडी सरकारच्या उदासीन धोरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं जनहित याचिका दाखल केली. डॉ. आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्याच्या प्रकल्पाचे काम थांबणे, हे खेदजनक असल्याचं न्यायालयानं नमूद केलंय. भाजपा प्रदेश सचिव यांनीही प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या धोरणाचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बाबासाहेबांच्या साहित्य छपाईचा 6 डिसेंबर म्हणजेच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी गती देण्याची मागणी केली आहे.
2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे खंड-18 भाग 1, भाग 2 आणि भाग 3 यांच्या मुद्रण व प्रकाशनासाठी मोठा पुढाकार घेतला. तीनही खंडांच्या 13 हजार अंकांची छपाई करून त्याचे वितरणसुद्धा केले. काही ग्रंथांच्या 50 हजार प्रती छापून त्याचे वितरणही झाले. त्यानंतरच्या काळात 20 हजार अंकांची छपाईसुद्धा झाली नाही. बाबासाहेबांच्या भाषणांच्या तीन खंडांसह बुद्धा अॅण्ड हिज धम्मा, पाली ग्रामर अॅण्ड पाली डिक्शनरी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅण्ड हिज इगॅलीटेरियन मुव्हमेंट या व अशा 9 खंडांच्या प्रत्येकी 1 लाख म्हणजे एकूण 9 लाख प्रतींची छपाई करण्याचे आदेश दिले.