नागपूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नवनियुक्त सदस्या कुंदा राऊत यांनी सभागृहामध्ये अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. त्यांचा अपमान करीत मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आक्रमक झाले आहेत. त्यामुळं आता अधिकारी वर्सेस पदाधिकारी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात अधिकारी महासंघाचे पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सोमवार (ता. २२) रोजी भेट घेणार आहेत. त्यांना निवेदनही सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सोबतच संघटनेचे शिष्टमंडळ मंत्री सुनील केदार यांचीही भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
संघटनेचे म्हणने आहे की, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात व सध्यस्थितीतही अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्यासह इतर पदाधिकारी, सदस्य व सीईओ योगेश कुंभेजकर यांच्या नेतृत्वात अधिकारी चांगले काम करत आले आहेत. जिल्हा परिषदेतील सर्वच अधिकारी हे लोकप्रतिनिधींशी सुसंवाद ठेवून नागपूर जिल्हा परिषदेची प्रतिमा ही जनमानसात उंचाविण्यासाठी कार्यरत आहेत. नागपूर जि.प.मध्ये अद्यापपर्यंतही पदाधिकारी व अधिकारी यांच्यात विसंवाद निर्माण झालेला नाही. अतिशय सुसंस्कृत पध्दतीने कामकाज करणारी जि.प.म्हणून नागपूर जि.प.ची ओळख आहे.
१८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत सदस्या कुंदा राऊत यांनी जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांना लक्ष्य केले. अपमान करून अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असंसदीय भाषेचा वापर करून कार्यरत अधिकाऱ्यांच्या ‘लायकी’बाबत सभागृहात विनाकारण मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप संघटनेने केलाय.
अधिकारी महासंघ आता आक्रमक झाला आहे. येत्या सोमवारला संघटनेकडून जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वेंसह, उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे इतर सर्व सभापती तसेच सीईओंची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करणार आहेत. भविष्यात असा प्रकार होणार नाही, यासाठी आपल्या स्तरावर योग्य उपाययोजना करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. सोबतच संघटनेचे एक शिष्टमंडळ लवकरच राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचीही भेट घेऊन त्यांना सर्वसाधारण सभेमध्ये घटलेल्या प्रकाराबाबत माहिती देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
इतर बातम्या