नागपूर : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना 35 कोटी रुपयांच्या साहित्यांचं वाटप केलं जाणार आहे, यात वॅाकिंग स्टिक (Walking Stick), श्रवण यंत्र (Hearing Aid), व्हीलचेअर यासारख्या विविध साहित्याचं वाटप केलं जाणार आहे. उद्या नागपुरातील रेशीमबाग मैदानात नऊ हजार लाभार्थ्याना साहित्याचे वाटप केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना साहित्य वाटपाची सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून नागपूर जिल्ह्यातील 35 हजार ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना साहित्याचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी गेले तीन महिने जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघानुसार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आलीय. केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगाना साहित्याचं निःशुल्क वाटप केलं जाणार आहे. अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजना व दिव्यांग सहायता योजनेच्या माध्यमातून शहरातील वृद्ध व दिव्यांग लाभार्थ्यांना 43 प्रकारच्या साहित्य व उपकरणाचे नि:शुल्क वितरण 25 ऑगस्टपासून सुरू होत आहे. नागपुरातील सहाही विधानसभा मतदारसंघात उपकरण वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी ही योजना शहरात राबविली जात आहे. यामुळे वृद्ध व दिव्यांगांचे जीवन सुसह्य होणार आहे. या उपकरण वितरणाचा दक्षिण नागपूरमधील 9 हजार लाभार्थ्यांचा कार्यक्रम येत्या 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता रेशीमबाग मैदानावर सुरू होईल. सुरुवातीला आनंदवन येथील अंध दिव्यांगांचा संगीत कार्यक्रम होईल. दुपारी 1.30 वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल. उद्घाटन सोहळ्यानंतर साहित्य वितरण करण्यात येईल.
दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी 25 ऑगस्ट रोजी रेशीमबाग मैदानावर सकाळी 12 वाजेपासून, पूर्व नागपूरसाठी 1 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेचे कच्छी विसा मैदान येथे सकाळी 10 वाजेपासून साहित्य वितरण सुरू होईल. उत्तर नागपूरसाठी 11 सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस मुख्यालय टेका नाका सकाळी 10 वाजेपासून, पश्चिम नागपूरसाठी 16 सप्टेंबर रोजी रवीनगर चौकाजवळ असलेले नागपूर विद्यापीठाचे मैदान येथे सकाळी 10 वाजेपासून, मध्य नागपूरसाठी 17 सप्टेंबर रोजी चिटणीस पार्क मैदान येथे सकाळी 10 वाजेपासून साहित्य वितरण सुरू होईल. दक्षिण-पश्चिम नागपूरसाठी 18 सप्टेंबर रोजी समाज कल्याण विभागाचे कार्यालय परिसर, अंध विद्यालयाजवळ दीक्षाभूमी चौक सकाळी 10 वाजेपासून वृद्ध व दिव्यांग लाभार्थ्यांच्या साहित्य वितरण सुरू होईल.