नागपूर : ईडीच्या छापेमारीमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. ईडीने नागपुरात 17 ठिकाणी छापेमारी केली आहे. नागपुरातील अनेक स्टील, लोहा, उद्योगातील गुंतवणूकदार ईडीच्या रडारवर आहेत. या सर्वांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या 17 ठिकाणच्या छापेमारीत ईडीच्या हाती अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय अनेकांची फसवणुक करणाऱ्या पंकज मेहाडियाच्या घराचीही झाडाझडती करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागपुरात आर संदेश ग्रुपवर ईडीने धाडी मारल्या. आर संदेश ग्रुपचे बांधकाम आणि औषध यासह अनेक क्षेत्रात गुंतवणूक आहे. रामदेव उर्फ रम्मु अग्रवाल यांचा घर आणि कार्यालयावर काल सकाळी ईडीने छापेमारी केली. काल सकाळी ईडीच्या 50 अधिकाऱ्यांची एक टीम अग्रवाल यांच्या रामदासपेठ येथील निवासस्थानी पोहोचली. तसेच संदेश सिटी ग्रुप आणि संदेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयातही शोध मोहीम सुरू केली.
पंकज मेहाडिया याच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले आहेत. पंकज मेहाडिया हा नागपूरमधील ठगबाज म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर व्यापाऱ्यांना अधिकचे व्याज दाखवून त्यांना ठकवल्याचा आरोप आहे. तो नागपूरच्या रामदास पेठेत राहतो. त्याच्या आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हे अन्वेषण शाखेच्या आर्थिक विभागाने यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याला अटकही करण्यात आली होती. 2021मध्ये त्याला तुरुंगातही पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर काल ईडीने त्याच्या घरावरही छापेमारी केली आहे.
दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये नागपूर आणि मुंबईत सुपारी तस्करीच्या प्रकरणात 17 ठिकाणी छापेमारी केली होती. या धाडीत 11.5 कोटींची 289.57 टन सुपारी जप्त केली होती. तसेच 16.5 लाख रुपयेही जप्त केले होते. इंडोनेशियाहून भारत-म्यानमारच्या सीमेवरून सुपारीची तस्करी केली जात असल्याचं ईडीच्या तपासात आढळून आलं होतं. याप्रकरणी ईडीने अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली होती.