नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत चांगलीच टोलेबाजी केली. एकनाथ शिंदे सभागृहात बोलतात तेव्हा भाजप आमदार टाळ्या वाजवत नाहीत, असा दावा अजित पवारांनी केला. त्यांच्या या टोलेबाजीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. तुम्ही आमच्यात कितीही फुट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी भर सभागृहात विरोधकांना ठणकावून सांगितलं.
“अजित दादा, आता तुम्ही आमच्यामध्येच फूट पाडायला लागलात तर कशी मीटिंग होणार? मिटिंग होणार कशी? तुम्ही किती प्रयत्न केले, तरी मी तुमच्या चेहऱ्याकडे बघत होतो. मी जे बोलत होतो, तुम्हाला वाटलंच नव्हतं की, विदर्भामध्ये एवढ्या मोठ्या घोषणा होतील, इतक्या शेतकऱ्यांना आपण पैसे देऊ, आणि मी बघत होतो. दादा तुम्ही आता तिकडे बघायला लागले. म्हणजे तुम्ही सिलेक्टिव ऐकता. बरोबर?”, असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला.
“माझं बरोबर लक्ष होतं. प्रत्येकवेळाला काय टाळ्या वाजवायच्या? जेव्हा घोषणा व्हायची किंवा निर्णय व्हायचा तेव्हा सगळे टाळ्या वाजवायचे. मी तर इथे बाजूला बसलोय. उपमुख्यमंत्र्यांच्या हाताकडे लक्ष होतं. ते बरोबर वाजवत होते”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“दुसरी गोष्ट कितीही काही केलं तरी आमच्यावर काही परिणाम होणार नाही. आम्ही एका भूमिकेतून सरकार बनवलं आहे. हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. भास्करराव तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही बोलू शकत नाहीत”, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
“विदर्भाला न्याय मिळाला पाहिजे. अनुषेश भरुन काढला पाहिजे. आम्ही तो भरुन काढला. पण याचं श्रेय सरकारला मिळू नये यासाठी तुमचे प्रयत्न सुरु आहेत”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
“देवेंद्रजी माझा तुमच्यावर एक आक्षेप आहे, ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते त्यावेळेस एकही भाजपवाला टाळी वाजवत नाही”, असं अजित पवार सभागृहात म्हणाले.
“अध्यक्ष महोदय, तुम्ही टीव्हीमध्ये बघा. एक मिनिट, हरीश पिंपळे साहेब तुम्ही फक्त अधूनमधून वाजवायचे. तानाजीराव गेले. तानाजीरावांनी आमच्याच लोकांना सांगितलं की, टाळ्या वाजवा”, असा टोला अजित पवारांनी लगावला.
“माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगण आहे, कुठलीही एखादी गोष्ट सांगत असताना, तुम्ही मुख्यमंत्री आहात, मान्यता करतो, प्रस्ताव पाठवला का? असं का बोलता? हे मी करणार, असं बोलाना. मान्यता वगैरे काय? तो तुमचा अधिकार आहे. म्हणे, मी कॅबिनेट पाठवतो. तुम्ही कशाला सांगता, कॅबिनेटला पाठवतो असं. मी कॅबिनेटमध्ये करुन घेणार, असं बोला. एक मेसेज लोकांमध्ये जायचे”, असं अजित पवारांनी म्हटलं.
“हे महाराज उपमुख्यमंत्री असताना रेटून बोलत आहेत. तुम्ही मात्र जरा मागे मागे येतायत”, असं अजित पवार म्हणाले.