‘बिल क्लिंटन विचारतो, एकनाथ शिंदे केवढं काम करतो, कधी खातो, कधी झोपतो’, मुख्यमंत्र्यांचा दावा

| Updated on: Dec 21, 2022 | 11:06 PM

आपल्या कार्याची दखल थेट अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी घेतल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.

बिल क्लिंटन विचारतो, एकनाथ शिंदे केवढं काम करतो, कधी खातो, कधी झोपतो, मुख्यमंत्र्यांचा दावा
एकनाथ शिंदे
Follow us on

गिरीश गायकवाड, नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतील तब्बल 50 आमदारांचा गट घेऊन सरकारमधून बाहेर पडले. त्यांनी शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांना फोडून बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलं. त्यांच्या या कार्याला ते उठाव मानतात. विशेष म्हणजे आपल्या या उठावाची दखल थेट अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी घेतल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. ते नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महासत्तांतर’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी याबाबतचं विधान केलंय.

“माझ्याकडे गेल्या एक महिन्यापूर्वी एक माणूस आला होता. तो बिल क्लिंटनकडे राहतो. तो खरंतर भारतीय आहे. पण त्यांच्याकडे तो आहे. त्याचा नातेवाईक गेला होता. त्याला बोलतो हु इज एकनाथ शिंदे, कोण आहे, केवढं काम करतो, कधी खातो, कधी झोपतो”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“आजही पत्रकार मित्र उत्सुकाने विचारतात. खरंतर सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत”, असं एकनाथ शिंदे पुढे म्हणाले.

दरम्यान, “काही लोकांना वाटलं आम्ही संपलो. पण तसं नाही”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.

आम्ही मुख्यमंत्री पदासाठी हा निर्णय घेतलेला नाही, असंही ते यावेळी म्हणाले. तसेच “सरकार कुठल्याही सूड भावनेने काम करत नाहीय”, असं शिंदेंनी स्पष्ट केलं.

“राजकारणात विश्वास आणि कमिटमेंटला फार महत्त्व असतं. 50 आमदार एकत्र येणं सोपं नाहीय. त्यापैकी 9 मंत्री होते. ते सत्ता सोडून आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका त्यांनी घेतली. हेच बलस्थान आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मला विश्वास होता की जी भूमिका आम्ही घेतली ती योग्य होती. राज्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आम्ही केलंय. मुख्यमंत्रीपद हवं म्हणून मी हे सगळे बिल्कुल केलं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

निर्णय घेतला, शब्द दिला तर तो पाळला पाहिजे. मी कधीच घाबरलो नाही. मविआत गेल्यानंतर सर्व आमदारांमध्ये चलबिचल होती. मी सगळ्यांना वेळ देतो म्हणून वेळ लागतो, असं शिंदे म्हणाले.

“मी कधीही सूड भावनेनं काम करत नाही. मी मदत केली की सांगत नाही. मी कोत्या वृत्तीचा नाही. कोत्या मानसिकतेचा नाही”, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.