नागपूर | 6 डिसेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चहापानाच्या कार्यक्रमानंतर आज एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “विरोधक आम्हाला म्हणाले की, स्वाभिमान हरवलं आहे, दिल्लीत जातात, कठपुतली आहे, आता ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही, त्यांनी आमच्यावर आरोप करायचे? स्वाभिमानाची भाषा करायची? अरे आम्ही दिल्लीला जातो ना, दिल्लीला जातो, निधी आणतो. केंद्र सरकारने आम्हाला पैसे दिले आहेत, ते मागितल्याशिवाय मिळत नाही ना, प्रयत्न करावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो, गेल्या अडीच वर्षात अंहकार, या अहंकारामुळे केंद्र सरकारने पैसे दिले नाही. का? तुम्ही मागायला पाहिजे ना. आपल्या अहंकारामुळे राज्याचं नुकसान ज्यांनी केलं, अनेक प्रकल्प बंद पाडले, स्थगित केलं, आमचं सरकार आल्यापासून मेट्रो, आरेपासून अनेक प्रकल्प सुरु केलं. हे सर्व प्रकल्प बंद पाडण्याचे काम त्यांनी केलं. त्यांनी जलयुक्त शिवार सारख्या प्रकल्पाची चौकशी लावली”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
“तुम्ही विकासाच्या बाता करता. पण लोकं सुज्ञ आहेत. मी एवढंच सांगतो, सत्ता काबीज करण्याचं त्यांचं स्वप्न तीन राज्याच्या निवडणुकांनी साफ केलेल्या आहेत. त्यांच्या सत्ताकाबीज करण्याचे दोर पूर्णपणे कापलं आहे. त्यामुळे ते कठपुतली आणि इतर गोष्टी बोलत आहेत. आमच्या दोऱ्या लोकांच्या हातात आहेत याचा आम्हाला अभिमान आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“आम्ही आरक्षणाबाबत सुरुवातीपासून भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आणि इतर समजावर अन्याय होणार नाही, कुणाचंही आरक्षण कमी केलं जाणार नाही, ही भूमिका आमची स्पष्ट आहे. मुंबईत दसरा मेळाव्यात शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आम्ही सांगितलं आहे. आमच्या सरकारची भूमिका मराठा समाजारा आरक्षण देण्याची भूमिका आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“आम्ही ओबीसी समाजासोबत बैठक घेतली. त्यांनाही सांगितलं की, ओबीसींचं आरक्षणाबाबत चिंता करु नका. नोदींचा विषय आहे, शिंदे कमिटी काम करत आहे. तो जीआर आधीचा आहे. आम्ही नवीन काम करत नाही. ज्या जुन्या नोंदी आहेत, रक्ताची नाते आहेत, याबाबत नोंदी सुरु आहेत. मराठा आरक्षण देण्याचं काम सरकार करेल. सर्व विरोधी पक्षांची आम्ही बैठक घेतली. सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगितलं की, मराठा समजाला टिकणारं आरक्षण सरकार देणार. मराठा समाजाने विश्वास ठेवावा”, असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलं.