नागपूर : 2021 हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने नावडते ठरले. फेब्रुवारी अखेरपासून वाढलेली रुग्णसंख्या आणि त्यातून हिरावलेले अनेकांचे नातलग या सरत्या वर्षाने एक कटू आठवण म्हणून नोंदविली गेली आहे. या सर्व परिस्थितीत शहराची पालकसंस्था म्हणून नागपूर महापालिकेने नागपूरकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व शर्थीचे प्रयत्न केले. शहरातील नागरिकांना कोरोना संसर्गाच्या धोक्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर 2021मध्ये फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात दुसरी लाट आली. रुग्णसंख्या वाढू लागली. या काळात कोरोनाचा संसर्ग थोपविण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह चाचणीवर भर देण्यात आला. नागपूर महापालिकेद्वारे ठिकठिकाणी कोरोना चाचणी केंद्र उभारण्यात आली. नागरिकांना सौम्य लक्षणे असल्यास त्यांनी चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन वारंवार मनपातर्फे करण्यात आले. मनपातर्फे चाचणीवर भर दिला गेला. त्यातून कोरोना रुग्णांचा पत्ता लावून त्यांचे उपचार करण्यात आले.
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकारानं नागपूर महापालिकेच्या परिवहन सेवेमधील आपली बसच्या ताफ्यातील मिनी बसेसचे रुग्णवाहिकेमध्ये परिवर्तन करण्यात आले. केवळ 10 दिवसांत मनपाच्या 25 मिनी बस नि:शुल्क रुग्णवाहिकेची सेवा देण्यासाठी तैनात करण्यात आली. पुढे या रुग्णवाहिकांची संख्या वाढवून 65 करण्यात आली. रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय बसमधील वाहकांना मनपाच्या डॉक्टरांमार्फत ऑक्सिजन लावण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी परिवहन विभागामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्याचे संपर्क क्रमांक प्रसारीत करण्यात आले. आरोग्य विभागावर आलेला ताण लक्षात घेता या रुग्णवाहिकेबाबत परिवहन विभागामध्ये वेगळी यंत्रणा तयार करण्यात आली. नागरिकांना 24 तास रुग्णवाहिकेची सेवा मिळावी यासाठी वाहक व चालकांची प्रत्येकी 6 तासाची कामाची पाळी ठेवून त्यांचा खासगी कॅशलेस आरोग्य विमा मनपातर्फे काढण्यात आला.
नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या 46 लाखांच्या तर शहराची लोकसंख्या 23 लाखांच्या घरात आहे. नागपूर जिल्हाच नव्हे तर नजिकच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड सीमेवरील शहरांतील नागरिकही नागपूर शहरातील आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी येतात. कोरोना काळात हा ताण जास्त वाढला. महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि तत्कालीन जिल्हाधिकारी रविन्द्र ठाकरे यांच्या नेतृत्वात रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्टची व्यवस्था करण्यासोबतच बेड्सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. परिणामी नागपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलने प्रति दहा लाख लोकसंख्येमागे असलेल्या बेड्सची संख्या राज्यात सर्वाधिक होती. नागपुरात ऑक्सिजन नसलेले बेड्स 16632, ऑक्सिजनची उपलब्धता असलेले बेड्स 9944 तर आय.सी.यू. बेड्सची संख्या 2807, आय.सी.यू. व्हेंटिलेटर बेड्सची संख्या 996 एवढी होती.