महाविकास आघाडीकडून प्रचंड खटाटोप, तरीही नागपुरात चौरंगी लढत, आता पुढे काय?

| Updated on: Jan 17, 2023 | 4:04 PM

अनेक नाट्यमय घडामोडींनंतरही नागपुरात चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे हा महाविकास आघाडीसाठी (Maha Vikas Aghadi) धक्का मानला जातोय.

महाविकास आघाडीकडून प्रचंड खटाटोप, तरीही नागपुरात चौरंगी लढत, आता पुढे काय?
महाविकास आघाडी
Follow us on

गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या (Shikshak-Padvidhar Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलेलं बघायला मिळत आहे. येत्या 30 जानेवारीला दोन शिक्षक तर तीन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 2 फेब्रुवारीला समोर येईल. या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात अनेक उमेदवार इच्छूक होते. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी या निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण भाजपचा (BJP) पराभव करायचा असेल तर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) एकत्रित लढणं भाग असल्याचं मत विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रित येऊन उमेदवार निश्चित केले आणि अधिकृत उमेदवार जाहीर केले. पण तरीही काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं बघायला मिळालं. याचा सर्वाधिक फटका अर्थातच महाविकास आघाडीला बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर काही अपक्ष उमेदवारांवर संबंधित पक्षांकडून कारवाई करण्यात आल्याची देखील माहिती समोर आलीय. पण या नाट्यमय घडामोडींदरम्यान नागपुरात चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे हा महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जातोय.

नागूपर शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी सुरुवातीला काँग्रेस आग्रही नव्हती. नागपूरची ही जागा सुरुवातीला शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी निश्चित झाली होती. ठाकरे गटाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांच्यासाठी ही जागा सोडण्यात आली. पण त्यामुळे नागपूर काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला.

महाविकास आघाडीत गोंधळलेली स्थिती

या दरम्यान शिक्षक भारतीचे पदाधिकारी राजेंद्र झाडे आणि काँग्रेसप्रणित शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सुधाकर आडबाले यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हेही असे की थोडके शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरचे प्रवक्ते सतीश इटकेलवार यांनीही अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीची आणखी गोंधळलेली स्थिती बघायला मिळाली.

हे सुद्धा वाचा

या सगळ्या राजकीय गोंधळानंतर महाविकास आघाडीने सुधाकर आडबाले यांची उमेदवारी निश्चित केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने सतीश इटकेलवार यांना उमेदवारी मागे घेण्याचा आदेश दिला. इटकेलवार यांनी सुरुवातीला उमेदवारी मागे घेण्यास होकार दिला. पण नंतर ते दिवसभर नॉट रिचेबल राहिले. अखेर त्यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही.

नागपुरात अखेर आता चौरंगी लढत

सतीश इटकेलवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही म्हणून नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आता चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर आडबाले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडेही मैदानात आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सतीश इटकेलवार यांनीदेखील अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे ते निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. दुसरीकडे भाजपकडून नागो गाणार यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन करण्यात आल्यानंतरही सतीश इटकेलवार यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही म्हणून पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. विशेष म्हणजे या सगळ्या राजकीय गदारोळादरम्यान महाविकास आघाडीकडून बंडखोरी थांबवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न झाले. पण अखेर या निवडणुकीत चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय.