नागपूर : कचरा वेचणं हा टोलीतील सुमारे तीन हजार लोकांचा व्यवसाय. पोटाची खडगी भरण्यासाठी हा व्यवसाय त्यांना करावा लागतो. पण, आता या कचऱ्यानं त्यांच्या आयुष्याचा कचरा केलाय. खरुजासारख्या संसर्गजन्य आजारानं त्यांना ग्रासलंय. पण, उपचार करण्यासाठी त्यांच्याकडं पैसे नाहीत. डॉक्टरांची फीस पाहून त्यांचे डोळे दीपतात. संसर्गाचा मार सहन करत जगावं लागतं.
टोलीची लोकसंख्या साडेतीन हजार आहे. कचरा वेचण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. कचऱ्याचं वर्गीकरण करणं, विकणं यातच त्यांचा बहुतेक वेळ जातो. गरज पूर्ण करताना 80 टक्के लोकांना खरुजचा संसर्ग झाला. येथे अडीच हजारावर लोक खरुजग्रस्त आहेत. पण, ते डॉक्टरकडं जात नाहीत. कारण त्याचा खर्च यांना परवडणारा नाही.
टोलीला खरुज आजारावर एकाच वेळी उपचाराची गरज आहे. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाला टोलीत शिरलेल्या खरुज संसर्गाची माहितीच नाही. महापालिकेचे फिरते पथक म्हणजे वैद्यकीय आरोग्य सेवेला शोभेल असा पांढरा हत्तीच. टोलीच्या दिशेने फिरते पथक सहसा रवाना होत नाही. एक वर्षाच्या बाळापासून तर 80 वर्षाच्या म्हताऱ्यांच्या अंगावर खरुजामुळे पुरळ आलेत. जिथं जिथं खाज सुटेल तिथं तिथं हे खाजविताना दिसतात. मग खाजवून खाजवून रक्ताच्या धारा वाहत पायाच्या बोटापर्यंत येतात.
कचरा वेचताना कचऱ्यातील घाण हातापायाना लागते. तोच कचरा कचरा पोत्यांमध्ये भरून तो पाठीवर यांना घ्यावा लागतो. त्यामुळे कचऱ्यातील घाण पाणी अंगावर पडून खरुजसारखे त्वचा रोग होतात. कचरावेचकांना मोठ्या प्रमाणात खरुज व इतरही त्वचारोग दिसून येतात, अशी माहिती मेडिकलचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण शिंगाडे यांनी सांगितलं.
टोलीत शिरलेल्या खरुजला प्रतिबंध करायचा असेल तर, खरुज झालेल्या लोकांशी जवळचा संपर्क टाळावा लागेल. माणसापासून माणसाला दूर ठेवणारा आजारच टोलीतील अडीच हजारावर लोकांना जडला आहे. या आजारानेही टोलीला बहिष्कृत केले. भुकेल्या पोटासाठी भंगार वेचण्यासाठी बाया माणसं बाहेर पडतात. थंडी असो की पावसाळा नाल्यांमध्ये, कचऱ्याच्या उकीरड्यावर कचरा, घाणीत हात पाय टाकावं लागते. म्हणून त्यांना खरुज झालंय. कचऱ्यात हात टाकला नाही तर खायला मिळणार नाही, ही भीती आहे. यामुळेच हे कोणालाही खरुज संसर्गाबद्दल सहसा सांगत नाही.