नागपूर : म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चेअंती घरकुलाचा निधी (Gharkulacha Nidhi) त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन (Relief and Rehabilitation) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. घरकुलाबाबत राज्य शासन लवकर धोरणात्मक बदल करुन नागरिकांना दिलासा देईल. ही कामे दर्जेदार होण्यावर भर देण्यात येईल. शासन नेहमी पाठीशी आहे, अशी ग्वाही तनपुरे यांनी दिली. काटोल येथील ग्रामीण रुग्णालयाचे (Rural Hospital at Katol) रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्याच्या प्रस्तावाचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले. नगरविकास विभागाने विकास विषयक कामांना नेहमी प्राधान्य दिले आहे. याबाबीसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
काटोल नगरपरिषद येथे आढावा बैठकीत ते बोलत होते. आदिवासींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यावर आपला नेहमी भर राहिला आहे. त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर लक्ष केंद्रित आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा काटोल तालुक्यातील भोरगड येथे झाली. त्यामुळं दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यास मदत होईल. त्याबरोबरच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नांदोरा, मेठेपठार (जंगली), खापा या गावांना जोणाऱ्या रस्त्यामुळे नागरिकांना दळणवळणाची सुविधा मिळेल, असे त्यांनी सांगितले. मानवविकास कार्यक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र व अभ्यासिकेचे लोकार्पण प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अद्यावत संगणीकरण कक्ष, सभागृह यांची पाहणी त्यांनी केली. सोनोली येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे भूमिपूजन करून नगर परिषद नरखेड व मोहाड येथील कामांचा आढावाही त्यांनी घेतला.
ग्रामपंचायत कोंढाळीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्याच्या प्रस्तावाचा शासनस्तरावर जातीने पाठपुरावा करण्याची हमी त्यांनी दिली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नये, अशा सूचना त्यांनी केली. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, त्यांना वीज वाजवी दरात कशी देता येईल. याकडे महावितरणच्या यंत्रणेने लक्ष दयावे. प्रास्ताविक राहुल देशमुख यांनी केले. यावेळी सलील देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी ग्रामपंचायत कोंढाळी येथे त्यांनी भेट दिली. त्यानंतर नांदोरा रस्त्याचे लोकार्पण केले. काटोल येथे काटोल-जलालखेडा व नागपूर या रस्त्यांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.