नागपूर : नागपुरात मनपा आरोग्य विभागाची (Health Department) सेवा संपूर्ण ठेपाळली आहे. एकीकडं दिल्लीत आरोग्य सेंटर मजबूत होत आहे आणि नागपुरात डॉक्टरांची वाणवा दिसून येत आहे. नरसाळा येथे 50 हजार लोकसंख्येसाठी एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. पण, तो डॉक्टर दोन तास ओपीडी ट्रीटमेंटसाठी येतो. पण, गेल्या 3 दिवसांपासून डॉक्टर सुटीवर असल्याचं तिथंल्या परिचारिकेनं सांगितलं. त्यामुळं नरसाळ्यातील मनपाचे रुग्णालय (Hospital) ऑक्सिजनवर आहे. तिथले इतर कर्मचारी कुणी खुर्चीवर झोपा काढतात, तर कुणी मोबाईल पाहून टाईमपास करतात. कारण, डॉक्टर नसल्यानं रुग्णालयावर कुणाचाही धाक नाही. रुग्णांची परवड सुरू आहे. रुग्ण येतात. चौकशी करतात नि परत जातात. दाद कुणाकडं मागायची असा प्रश्न पडतो. साधं सुचना फलकंही नाही. विचारणा कोणाला करणार? गरोदर (Pregnant) महिला रुग्णालयात येतात. तपासणीअभावी तशाच परत जातात. सध्या सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. अशावेळी पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था करणे आवश्यक होते. पण, ते मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली नाही. त्यामुळं रोज 50-100 रुग्ण येऊन डॉक्टर नसल्यानं परत जातात. या ठिकाणी कोविड सेंटरही आहे. पण, डॉक्टरचं नसल्यानं त्या टेस्टही बंद आहेत.
यासंदर्भात महिला परिचारिकेला विचारणा केली असता तुमची काही तक्रार असेल तर सिव्हीलच्या कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला. नरसाळ्यातील रुग्णालयात साधे सूचनाफलकही लावण्यात आले नव्हते. हनुमाननगर झोनच्या डॉ. पांडे यांना विचारणा केली असता त्यांनी दुसऱ्या सेंटरवर जाऊन तपासणी करा, असं सांगितलं. शिवाय पर्यायी डॉक्टरची व्यवस्था करणे माझ्याकडं नसल्याचं सांगून हात झटकले. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. बहीरवार यांना विचारणा केली. ते म्हणाले, नरसाळा रुग्णालयात डॉ. खेमुका आहेत. ते पाच ते सात अशा तीन दिवासांच्या सुटीवर गेलेत. पर्यायी व्यवस्था करण्याचे काम सीपीएम डॉ. अश्विनी निकम यांच्याकडं होते. परंतु, त्यांनी ते का केलं नाही, यासंदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविणार आहे.
डॉ. अश्निनी निकम यांनी चूक कबुल केली. मीसुद्धा तीन-चार दिवस सुटीवर होती. तिथल्या पार्टटाईम डॉक्टरची दुसरीकडं पोस्टींग झाली. त्यामुळं ही समस्या उद्भवल्याचं सांगितलं. शिवाय रुग्णालयात सूचनाफलक लावण्याचे निर्देश देणार असल्याचं त्या म्हणाल्या. परंतु, पर्यायी व्यवस्था न केल्यामुळं गरोदर महिलांची चांगलीच परवड झाली. आता उद्या, गुरुवारी डॉक्टर येणार असल्याचं डॉ. निकम यांनी सांगितलं. पण, गेली 3 दिवस रुग्णांना हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्या. वरिष्ठ डॉक्टरांनी मात्र, नरसाळ्याचे डॉक्टर फक्त तीन दिवस सुटीवर असल्याचं म्हटलं. या सर्व गदारोळात गरोदर महिलांना चांगलीच पायपीट करावी लागली. नगरसेवक माजी झाल्यानं तक्रार करण्यासाठी पदाधिकारी उरले नाहीत. निवडणुका आल्या की, हेच पदाधिकारी सक्रिय होतील, तोपर्यंत मनपाची आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवर असल्याचं चित्र आहे. नागपूर मनपाचे एकटे प्रशासक गाडा कसा हाकणार, हा प्रश्नच आहे.