नागपूर : सिकलसेल या गंभीर आजाराबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत सिकलसेल नियंत्रण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, डागा स्त्री रुग्णालयात हा सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहादरम्यान तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.
या सप्ताहादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुगणालय, डागा स्त्री रुग्णालयात प्राथमिक तपासणी मोफत करण्यात येत आहे. तपासणीमध्ये सकारात्मक येणाऱ्या रक्त नमुन्याची इलेक्ट्रोफोरोसिस तपासणी व आवश्यकतेनुसार एचपीएलसी तपासणी करण्यात येणार आहे.
जनसामान्यामध्ये सिकलसेल आजाराबाबत उपचार, प्रसार व प्रतिबंधबाबत माहिती आरोग्य संस्थांद्वारे देण्यात येणारआहे. आवश्यतेनुसार औषधोपचार व संदर्भसेवा देखील देण्यात येणार आहे. त्यासोबतच डागा स्त्री रुग्णालयात डे केअर सेंटर रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत आहे. या सेंटरमार्फत वाहक व रुग्ण विवाहपूर्व कुटुंब नियोजन नियमित उपचार व घ्यावयाची काळजीबाबत समुपदेशन व औषधोपचार करण्यात येणार आहे.
प्रसूतीपूर्व गर्भजल निदान तपासणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच गर्भजल परीक्षणासाठी समुपदेशन केले जाणार आहे. डे केअर सेंटरमार्फत गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना हायड्रॉक्सी युरीया या विशेष औषधाची मोफत सोय करण्यात येणार आहे. सप्ताहादरम्यान सिकलसेल रुग्णांचा रक्त संक्रमणासाठी महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदचे ओळखपत्र देखील तयार करण्यात येणार आहे.
सिकलसेल हा आजार गर्भधारणेच्या वेळी जेनेटीक बदलामुळे होतो. तसेच रक्तदोषामुळे उद्भणारा दुर्धर आजार आहे. जन्मापासून मनुष्याच्या अंतापर्यंत सोबत राहतो. रक्तात लाल व पांढऱ्या अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. परंतु सिकलसेल रुग्णात पेशीचा आकार ऑक्सिजन पुरवठ्याअभावी विळ्यासारखा होतो. आई आणि वडील दोघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होतो. अत्यंत दुर्धर व अनुवांशिक आजार म्हणून रक्त द्यावे लागते. रक्ताचे प्रमाण कमी राहत असल्याने रुग्ण वारंवार आजारी पडतो.