तेजस मोहतुरे
भंडारा : नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर नाराज होत साकोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सेवक वाघाये (Sevak Waghaye) यांनी राजीनामा दिला होता. दरम्यान, सेवक वाघाये यांनी वंचित विकास आघाडीची कास धरली होती. सेवक वाघाये यांनी शनिवारी पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात घरवापसी केली. दोन वर्षांनंतर जिल्ह्यातून गायब असलेले सेवक वाघाये चक्क विश्वजित कदम सोबत जाहीर सभेत व्यासपीठावर दिसले. त्यामुळं सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. नाना पटोले यांना काँग्रेसने ऐनवेळी साकोली विधानसभा क्षेत्राची टिकीट दिल्याने 2019 मध्ये सेवक वाघाये यांनी काँग्रेसचा हात सोडला होता. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नाना पटोलेंविरुद्ध जाहीर सभेत नाराजी व्यक्त केली. त्यामुळं आता नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळं नाना पटोले यांच्याशी सेवक वाघाये यांना जुळवून घ्यावे लागेल.
सेवक वाघाये हे जुने काँग्रेसी नेते आहेत. मध्यंतरी त्यांनी काँग्रेसचा हात सोडला होता. आता ते परत आले आहेत. आम्ही सेवक वाघाये यांचा हात सोडणार नसल्याचं विश्वजित कदम यांनी सांगितलं. तर सेवक वाघाये म्हणाले, माझ्यावर पक्षाकडून अन्याय झाला. अन्याय होत असतो. पण, माझ्यासारखा अन्याय कुणावर होऊ नये, हे माझं म्हणण आहे. काँग्रेसच्या विचारधारेचा मी माणूस आहे. काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी या माझ्या गडेगाव येथील घरी येऊन गेल्या आहेत. त्यामुळं मी काँग्रेसवासी आहे. पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम हे सध्या पालकमंत्री आहेत. त्यांनी आग्रह केला म्हणून मी काँग्रेसमध्ये परत आलो. काँग्रेसचा गमचा घातला. आता जुन्या विचारसरणीत मिसळलो. पुढची जबाबदारी मी विश्वजित कदम यांच्यावर सोपविली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार, असंही वाघाये यांनी यावेळी सांगितलं.
नाना पटोले आणि सेवक वाघाये यांची राजकीय कारकीर्द एकाच वेळी सुरू झाली. नानाभाऊ लाखांदूरचे तर सेवकभाऊ साकोलीचे आमदार होते. पण, लाखांदूर विधानसभा क्षेत्र कमी झाले आणि साकोली हे एकच विधानसभा क्षेत्र राहिले. त्यामुळं एका आमदारकीसाठी दोन काँग्रेसचे उमेदवार होते. नाना पटोले यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने सेवकभाऊ नाराज झाले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने वाद निर्माण झाला. एकाच पक्षात राहून एकमेकांच्या तक्रारी सुरू होत्या. आता परिस्थिती नाना पटोले यांच्या बाजूची आहे. ते प्रदेशाध्यक्ष पदावर पोहचले. सेवक वाघाये हे राजकारणापासून अलिप्त झाले होते. आता ते पुन्हा सक्रिय झालेत. पण, आता सेवक वाघाये यांना नाना पटोले यांच्याशी जुळवून घ्यावे लागले.
SPPU Exam | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच, तारीखही ठरली