नागपूर : आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक कुणाशीही शेअर करू नका. असं बँकेकडून वारंवार सांगितलं जातं. तरीही काही जण तो शेअर करतात आणि त्यांची फसवणूक होते. असाच एक प्रकार उमरेडमध्ये घडला. ओटीपी क्रमांक सांगणं पावणेपाच लाख रुपयांवर घसरलं.
बँकेचं क्रेडिट कार्ड बंद करायचंय तर मग तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा, असा एक फोन आला. या ओटीपी क्रमांकावरून एका खातेदाराची चार लाख 72 हजार 489 रुपयांची फसवणूक करण्यात आली. उमरेडमधील मंगळवारी पेठेत राहणारे प्रवीण लाडेकर यांच्याकडं भारतीय स्टेट बँकेचे क्रेडिट व डेबीट कार्ड आहे. तुमच्या क्रेडिट कार्डवर 27 हजार रुपये बाकी आहेत. तुमचे कार्ड बंद करायचं असेल तर सांगा. मी बँकेतून अधिकारी बोलते. ते बंद करून देतो, अशी बतावणी केली.
प्रवीण यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ओटीपी क्रमांक दिला. आता तुमचे क्रेडिट कार्ड बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. एनओसी तुमच्या पत्त्यावर येईल, असं त्यांना सांगण्यात आलं. फोन बंद होताच प्रवीण यांच्या खात्यातील चार लाख 72 हजार 489 रुपयांची खरेदी करण्यात आली होती. प्रवीण यांना मेसेज येताच ते घाबरले.
भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत चौकशी केली. क्रेडिट कार्डच्या रकमेपोटी 39 हजार रुपये महिन्याला भरावे लागतील, असं त्यांना सांगण्यात आलं. क्रेडिट कार्डसाठी बँकेतून कुणीही फोन केला नव्हता, असं स्पष्ट करण्यात आलं. तसेच कुणीही तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठविला नव्हता, असंही सांगण्यात आलं. उमरेड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. माहिती तंत्रज्ञानाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आता सायबर क्राईमनं तपास होईल. कदाचित गुन्हेगार सापडेलही. पण, तोपर्यंत झालेला मनस्ताप कधीच भरून निघणार नाही.