नागपूर : उमरेड तालुक्यातील मकरधोकडा शिवारात पोलिसांनी बुधवारी हाडे जप्त केली. त्यानंतर मकरधोकडा शिवारात शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर दीड किमी अंतरावर मानवी कवटी आढळली. ही कवटी व हाडे कुणाची असणार यावर चर्चा सुरू झाली आहे. पोलीस शोधकार्याला लागले आहेत.
मकरधोकडा परिसरात मंगळवारी गणेश नरड हे जनावरे चराईसाठी परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांना ही हाडे दिसली. गणेश यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलीस शोध कार्याला लागले आहेत.
मकरधोकडाच्या दत्तनगर येथील नऊ वर्षीय मुलगी २६ सप्टेंबर रोजी गायब झाली. वैष्णवी हिराचंद काळे असं तीचं नाव आहे. तिचा पत्ता लागला नव्हता. ती गायब झालेल्या ठिकाणाजवळच ही हाडे तसेच कवटी सापडली. त्यामुळं ही हाडं त्या मुलीची तर नाहीत ना, अशी शंका येत आहे.
फॉरेन्सिक लॅबच्या चमूनं नमुन्यासाठी हाडे जप्त केलीत. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच या हाडे व कवटीचा उलगडा होईल. उमरेड गावात मानवी कवटीचा पंचनामा करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक यशवंत सोलके यांनी घटनास्थळाला भेट दिली.