नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा नागपूर पोलिसांच्या हाती लागला आहे. गडकरी यांना धमकी देणारा हा कैदी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. त्याची चौकशीही सुरू केलीय. पण 72 तास उलटले तरी त्याच्याकडील मोबाईल सापडत नाहीये. मोबाईल कुठे ठेवला हे सांगणं तर सोडाच पण उलट हा कैदी पोलिसांनाच आधी तो मोबाईल घेऊन या, मगच आरोप करा, असं आव्हान देत आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
कर्नाटकच्या बेळगाव कारागृहात असलेला कुख्यात गुंड जयेश कांथा याने नितीन गडकरी यांना धमकी दिली होती. त्याने तुरुंगातून फोन करून गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण त्याने ज्या मोबाईलवरून फोन केला तो फोन सापडेना. पोलिसांनी त्याला अनेक अंगाने प्रश्न केले. पण तो काही पोलिसांना ताकासतूर लागू देत नाहीये. त्यामुळे करावं तरी काय? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
उलट जाओ पहले फोन लेके आवो, अशी डायलॉगबाजी हा कैदी करत आहे. तुम्ही जो मोबाईल माझा आहे असं सांगताय आधी तो मोबाईल शोधा. त्यातील सीम कार्डही शोधा, असं आव्हानच हा कैदी पोलिसांना देत आहे. त्यामुळे 72 तासानंतरही फोन सापडत नसल्याने पोलिसांना मोठं अपयश आलं आहे.
दरम्यान, तुरुंग प्रशासनाचा बदला घेण्याच्या सूडभावनेतूनच नितीन गडकरी यांना फोन केल्याचं या कैद्याने म्हटल्याचं सांगितलं जात आहे.
जयेश याने तुरुंगातूनच नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन केला होता. 100 कोटींची खंडणी त्याने यावेळी मागितली. तसेच आपण दाऊद इब्राहीमचा साथीदार असल्याचं त्याने म्हटलं होतं. पोलिसांना त्याच्याकडे एक डायरी मिळाली आहे. त्यात नेते आणि मंत्र्यांचे फोन नंबर आहेत. पोलिसांनी ही डायरी जप्त केली आहे.
तसेच जयेशकडे राजकीय पुढारी आणि मंत्र्यांचे नंबर कसे आले? याचा शोध घेत आहे. या मंत्री, पुढाऱ्यांशी जयेशचे संबंध होते का? की हे मंत्री आणि पुढारी त्याच्या रडारवर होते? याचाही पोलीस शोध घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
या प्रकरणी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं म्हटलं होतं. फोनल हिंडाल्गा तुरुंगातून आला आहे. आम्ही या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहोत. हे प्रकरण आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतलं आहे. तसेच हा फोन करणाऱ्याच्या पार्श्वभूमीचाही तपास करणार आहोत, असं बोम्मई यांनी म्हटलं आहे.