गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 19 डिसेंबर 2023 : राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर अनेकांचा डोळा आहे. सर्वांनाच मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. तशी इच्छाही नेते बोलून दाखवत आहेत. तर कार्यकर्ते आपल्या नेत्यांची ही इच्छा बॅनर्स आणि होर्डिंग्जमधून व्यक्त करताना दिसत आहेत. अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी आशा व्यक्त केली आहे. अजितदादा मुख्यमंत्री होण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करणार असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. इकडे मिटकरी यांनी अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त करताच दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनीही मोठं विधान करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
बच्चू कडू मीडियाशी संवाद साधत होते. अमोल मिटकरी काय म्हणतात याला काही अर्थ नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी आकडा लागतो आणि त्यामुळे माझी जनतेला विनंती आहे की त्यांनी आम्हाला मत द्यावीत. आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत. म्हणजे घंटो का काम मिंटो में करण्याची ताकद आम्हाला मिळेल आणि मीच मुख्यमंत्री होईल, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राज्याच्या अधिवेशनात आज मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. पण त्यात मराठ्यांना अपेक्षित असा कुठलाही निर्णय मुख्यमंत्री घेणार नाहीत ही पहिली बाब आहे. दुसरं म्हणजे प्रकरण बरंच किचकट आहे. त्यामुळे यात वेळ जाणार आहे. आज मुख्यमंत्री जी भूमिका घेतील त्यात ते वेळ वाढवून मागतील, असेच आम्हाला वाटते, असा दावाही त्यांनी केला.
अनाथांबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे. सिडकोच्या धर्तीवर या सर्व अनाथ मुलांना 18 वर्षानंतर घर मिळाली पाहिजे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. तसेच ही मुलं 18 वर्षाची झाल्यानंतर त्यांच्या हातात एक रकमी पाच लाख रुपये येतील अशी एक योजना राबवली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. अशी योजना आणल्यास ही अनाथ मुले एकाकी पडणार नाहीत. ते त्यांच्या पायावर उभे राहतील. समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील. म्हणून आमची ही मागणी आहे, असं त्यांनी सांगितलं.
संसदेत खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यावरही बच्चू कडू यांनी भाष्य केलं. ते दोषी असतील, त्यांनी काही तरी गोंधळ केला असेल म्हणून निलंबित केलं असेल. भाजपची भूमिकाही चांगल्या पद्धतीने जात नाहीये. मित्र पक्षाची प्रतिमा चांगली राहिली पाहिजे, याची मला काळजी आहे. मी सरकारमध्ये आहे, त्यामुळे ही काळजी आहे. भाजपने विरोधकांबाबत सौम्य भूमिका घेतली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.