नागपूर | 31 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कटोलमधून अजितदादा गटाच्या तिकीटावर लढणार आहेत. असा दावा अजितदादा गटाचे प्रशांत पवार यांनी केला आहे. प्रशांत पवार यांच्या या दाव्यावर अनिल देशमुख यांनी विधान केलं आहे. देशमुख यांनी मनातील गोष्ट स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे नागपुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच काटोलची निवडणूक देशमुख यांच्यासाठी जड जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
अनिल देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजितदादा गटात जाणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. प्रशांत पवारला समजायला पाहिजेत, दुनियेला माहितीय की, मी शरद पवार यांच्या अतिशय जवळचा आणि शेवटपर्यंतसोबत राहणारा आहे. त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही. सगळ्यांना माहितीय मी शरद पवार साहेबांचा खंदा समर्थक आहे. मी त्यांची साथ सोडणार नाही, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. देशमुख यांनी शरद पवार यांच्या गटातच राहणार असल्याचं स्पष्ट केल्याने नागपूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. कटोलची जागा भाजप स्वत:कडे ठेवणार की अजितदादा गटाला देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
यावेळी देशमुख यांनी भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. गिरीश महाजन तिकडचा चिल्लर नेता आहे. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सगळीकडे मोठा प्रतिसाद मिळतोय. निवडणुकीत त्यानाच यश मिळेल, असा दावा देशमुख यांनी केला.
इंडिया आघाडीबरोबर आज महायुतीचीही बैठक होत आहे. वर्षा निवासस्थानी ही बैठक होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. करू देत त्यांना बैठक. त्याने काही होत नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीकडेच देशाचं लक्ष लागलं आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
देशातले अनेक महत्वाचे विषय आहेत. ते घेऊन आघाडी बनली आहे. महिला अत्याचार, खेळाडूंवरील अत्याचार आणि विविध विषय आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, आदी विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होील. जागावाटप किंवा पंतप्रधानपदाचा चेहरा या सध्या दुय्यम गोष्टी आहेत. सध्या तरी भाजपाला पर्याय म्हणून समविचारी पक्ष एकत्र येऊन काम करतायत. सगळ्यांशी चर्चेनंतरच जागावाटप आणि इतर निर्णय होतील, असं त्यांनी सांगितलं.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय हे खरंय. ईडी, सीबीआयला हाताशी धरून दबाव टाकला जातोय. माझ्याही बाबतीत तेच करण्यात आलं. मी नाही म्हणालो म्हणून मला तुरुंगात टाकलं, असा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे संयोजक होण्याची शक्यता आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्व ज्येष्ठ नेते एकत्रित चर्चा करून निर्णय घेतील, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.