मराठी माणसावर हल्ला करणाऱ्यावर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; आदित्य ठाकरे संतापले

| Updated on: Dec 20, 2024 | 11:50 AM

बीडमध्ये जी हत्या झाली अशी हत्या देशात कधी झाली नाही. भाजपच्याच नेत्याची हत्या झाली. भाजपच्याच राज्यात झाली. आज मुख्यमंत्री कारवाई करणार का? ज्याच्याशी संबंधित आरोपी आहे, त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढणार का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले आहेत.

मराठी माणसावर हल्ला करणाऱ्यावर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; आदित्य ठाकरे संतापले
aaditya thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कल्याणमधील हायफाय सोसायटीत झालेल्या मराठी कुटुंबावरील हल्ल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मराठी माणसावर हल्ला करणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची आज घोषणा केली पाहिजे, अशी मागणी करतानाच मराठी माणसावर हल्ला करणाऱ्या सोसायट्यांची ओसीच रद्द करण्याचा कायदा आणा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी ही मागणी केली आहे.

अनेक भाषिक, अनेक धर्मीय लोक मुंबईत राहतात. महाराष्ट्रात राहतात. सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. यापूर्वी मराठी-अमराठी हे वाद कधी नव्हते. व्हेज-नॉनव्हेज हे कुठून आलं? यापूर्वी असं नव्हतं. आम्ही हिंदूधर्मीय आहोत. आम्ही मटणमच्छी खातो. इतके दिवस हा प्रकार नव्हता. आता हा प्रकार कुठून आला? आमची मागणी ही आहे की कालचा जो वाद झाला. राज्यात कोणी व्हेज सोसायटी करत असेल तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे? मराठी माणसाला घर दिलं नाही तर ओसी अशा सोसायटीला ओसी देऊ नका. अशा हौसिंग सोसायटीवर कारवाई झाली पाहिजे. मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. दादागिरी केली तर त्याला पोलिसांनी दांडका दाखवला पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

बिल्डरांवर गुन्हा दाखल करा

हे मुख्यमंत्री महाराष्ट् प्रेमी असतील, या मातीतील असतील तर आमच्या मागणीला मान देऊन महाराष्ट्रद्रोहाचा कायदा आणतील. हौसिंग सोसायटी एरियाची नावे बदलत आहेत. बिल्डरही विभागांची नावे बदलत आहेत. अप्पर कफ परेड, अप्पर वरळी अशी नावे ठेवत आहेत. शिवरी लिहितात. शिवडी लिहा. परेल लिहितात, परळ लिहा. अशी नावे बदलणाऱ्या बिल्डरवर गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि यावर भाजपने उत्तर द्यायला पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मराठी नावं बदलू नका. असं करणाऱ्या बिल्डरला तुरुंगात टाका. ही टेस्ट केस असते. भाजपच्याच राज्यात असं का होतं? याचं उत्तर मिळायला हवं, अशी मागणी त्यांनी केली.

पार्सल तिकडे पाठवा

अडीच वर्षात मख्ख चेहरा असलेल्या मिंधेंचं राज्य होतं. आता भाजपचं राज्य आहे. या सरकारांमध्ये मराठी द्वेष आहे. दोन अडीच वर्षापासून व्हेज नॉनव्हेज वाद होऊ लागले आहेत. यापूर्वी असं नव्हतं. कुणाची तरी प्रथा परंपरा असेल. आमच्याही प्रथा परंपरा आहे. मटन खाल्लं म्हणजे घाणेरडे झालो का? फडणवीस यांनी जे पार्सल जिथून आले तिथे पाठवलं पाहिजे. त्या व्यक्तीवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.