नागपूर : बारावीच्या परीक्षा (12th Exam) उद्यापासून सुरू होणार आहेत. लवकरच दहावीच्याही परीक्षा (10th Exam) सुरू होणार आहेत. त्यामुळं दहावी, बारावीचे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त आहेत. ही बातमी आहे एक 17 वर्षीय विद्यार्थिनीची. ही विद्यार्थिनी रायपूरला राहते. घरी सगळं व्यवस्थित आहे. संपन्न परिवारातील ही विद्यार्थिनी आहे. सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्यानं तिच्याकडून घरच्यांचा अपेक्षा वाढल्या. तुला 90 टक्केच गुण मिळाले पाहिजे, यासाठी घरचे लोकं आग्रही करत होते. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून ती दबावात होती. घरच्यांच्या दबावाला कंटाळून शेवटी तिने घर सोडायचे ठरविले. मंगळवारी नागपूर रेल्वेस्थानकावर (Nagpur Railway Station) ही विद्यार्थिनी दिसली.
रेल्वे पोलिसांच्या व्हॉट्सअप गृपवर एक मेसेज आला. त्यात एका विद्यार्थिनीचा शोध घेण्याबाबत माहिती होती. इतवारी रेल्वेस्थानकाचे आरपीएफ यांनी मुलीचा शोध घेतला. ही विद्यार्थिनी रायपूर-सिकंदराबाद रेल्वेने प्रवास करत होती. फोटोतील चेहरा तिच्याशी मिळताजुळता असल्याने तिला नागपूर रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. फलाट क्रमांक आठवर ती उतरली.
रेल्वे सुरक्षा दलाच्या माहितीनुसार, तिचे आईवडील छत्तीसगडच्या महासमुंद येथे राहितात. ती विद्यार्थिनी नातेवाईकांकडे रायपूरला शिकत होती. शिवाय त्यांचे काही नातेवाईक नागपूरलाही आहेत. त्यामुळं तिला नागपुरातील नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. रात्री एकटी प्रवास करत असल्यानं तिला धोका होता. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तिला सुरक्षित नातेवाईकांकडे पोहचविले.