दिनेश दुखंडे, नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीय. या हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखली जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटात यासाठी जलद गतीने घडामोडी घडत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात आज संध्याकाळी सहा वाजता ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीला खुद्द ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. ही बैठक आज संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलीय.
उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला कसं घेरावं याबाबत व्यूहरचना ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
उद्धव ठाकरे विधानसभेत जाणार
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूरच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये त्यांचा दोन दिवस मुक्काम असणार आहे.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरे उद्या विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्याची शक्यता आहे. ते उद्या विधान भवनात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच समोरासमोर येण्याची दाट शक्यता आहे.
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मरहाविकास आघाडीची बैठक
ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडल्यानंतर उद्या सकाळी नऊ वाजता विधिमंडळात महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि आमदारांची बैठक बोलावण्यात आलीय. या बैठकीत विधिमंडळात राज्य सरकारला कसं घेरायचं याबाबत रणनीती आखली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले बघायला मिळाले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. विरोधकांनी ’50 खोके, एकदम ओक्के’च्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. विरोधकांनी हातात बॅनर्स घेऊन घोषणाबाजी केली.
लोककलावंतांचं आंदोलन
दरम्यान, नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोककलावंतांचा रस्त्यावर आगळावेगळा मोर्चा निघाला. शाहीर आणि लोककलावंतांच्या मागण्या पूर्ण करा, यासाठी टाळ, मृदंग, ढोल आणि ताशांच्या गजरात लोककलावंतांचा रस्त्यावरूनच नाचत-गाजत मोर्चा काढला. पेन्शन योजना कलावंतांना लागू व्हावी ही त्यांची आग्रही मागणी आहे. बऱ्याचवेळा पाठपुरावा करूनही सरकारने कोणतीच मदत न केल्याचा आरोप यावेळी आंदोलनकांनी केला.