राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर महायुतीने अभूतपूर्व यश मिळावले आहे. आतापर्यंतचे विजयाचे अनेक विक्रम या निकालाने मागे टाकले आहे. या विजयावर देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी गेल्या सहा महिन्यात या विजयासाठी खूप मेहनत घेतल्याचे त्यांनी सांगितले. अवघ्या 2-3 तासांची झोप आणि अविश्रांत मेहनतीने हा विजय मिळाल्याचे त्या म्हणाल्या. हे राज्य सुरळीत चालवण्यासाठी फडणवीस प्रयत्न करतील आणि प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न फडणवीस करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस अढळ
देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यात मध्यंतरी अनेक आंदोलनातून आरोप करण्यात आले. त्यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला. मध्यंतरी अनेक मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याविषयीची खंत व्यक्त केली. केवळ आपल्या एकट्यालाच ब्राह्मण असल्याने टार्गेट करण्यात येत असल्याचे वक्तव्य त्यांनी अनेक मंचावरून केले. पण देवेंद्र फडणवीस हे अढळ आहेत. ते सहजा सहजी विचलीत होत नाहीत. ते त्यांच्या मार्गाने जातात असे त्यांच्या आईने स्पष्ट केले. हा त्यांचा खास गुण त्यांनी समोर आणला.
केवळ दोन-तीन तासांची झोप
गेल्या सहा महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस हे पायाला भिंगरी लावल्यासारखे राज्यात फिरत आहेत. त्यांना दोन-तीन तासांची झोप मिळाली. त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली असे त्यांच्या आई म्हणाल्या. त्यांच्या मेहनतीने, कष्टाने हा विजय मिळाल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी आज दोघांचे फोनवर बोलणं झाल्याची माहिती दिली. त्यावेळी आपण त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि नागपूरला कधी येणार अशी विचारणा केल्याचे त्यांनी फडणवीस यांना विचारले. देवेंद्र फडणवीस हे संध्याकाळी नागपूरला पोहचणार आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत
आपण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री झालेले पाहिलेले आहे. आता त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदी पाहायचे आहे, अशी इच्छा त्यांच्या आईने व्यक्त केली. भाजपाने 128 जागांचा पल्ला गाठल्याने भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी जोर धरत आहे. तर याविषयीचा निर्णय सांसदीय समिती घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांनी सुद्धा ते मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.