नागपूर : महापालिकेच्या झोन कार्यालयांना पुरवठा करण्यात आलेल्या स्टेशनरी व प्रिटिंग साहित्यात 67 लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. गुरुवारी या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. कारवाईचा बडगा उगारताच घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अतुल मनोहर साकोडे व कोलबा जनार्दन साकोडे यांचा समावेश आहे. स्टेशनरी घोटाळ्यासंदर्भात मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी कोलबा साकोडे त्यांची पत्नी सुषमा साकोडे, अतुल साकोडे व मनोहर साकोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
आरोपींनी स्टेशनरीचा पुरवठा न करता खोटी बिले सादर केली होती. चारही आरोपी एकाच कुटुंबातील नसल्यानं ते दोषी नसल्याचं सांगत आहेत. बिलाची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर पुरवठा न करता मनपा अधिकाऱ्यांना शांत राहण्याचा सल्ला ते देत होते. आता चौकशीत त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावे सांगितली आहेत. पुरवठादारानं लेखा आणि वित्त विभागातील कर्मचाऱ्यांशी जवळचे संबंध निर्माण केले होते. अशा कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराच्या पैशातून तिरुपतीचे दर्शन घेतल्याची माहिती आहे.
महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा कोट्यवधी रुपयांचा आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यानं शासनानं उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून मनपा बरखास्त करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी याबाबतीत पत्र लिहिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे क्रीडा घोटाळा उघडकीस आला होता.
एजन्सीच्या चौघांनी महापालिकेतील कर्मचार्यांना हाताशी धरून ६७ लाखांची स्टेशनरी खरेदीचे खोटे बिले सादर केली. 67 लाखांची ही बिले वित्त व लेखा विभागात गेली. बिलाची शहानिशा न करता संबंधित एजन्सीला 67 लाख रुपये देऊन या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केले. सदर पोलिस स्टेशनने 67 लाख 8 हजार रुपयांची उचल केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी चार कर्मचार्यांना निलंबित केले. यात सामान्य प्रशासन विभागातील मोहन पडवंशी, वित्त विभागातील राजेश मेर्शाम, अफाक अहमद, श्रीमती नागदिवे यांचा समावेश आहे. याशिवाय याच विभागातील निवृत्त अधिकारी कराळे यांच्याविरोधात उपविभागीय चौकशीचे आदेश दिले.