नागपूर : वय वर्षे 15.. अंगात नेहमी ताप राहायचा… शरीरभर फोड आलेले… किडनी तसेच इतर अवयवांना नुकसान पोहचवित होते. गडचिरोलीवरून त्याला नागपूरच्या मेडिकलमध्ये शिफ्ट केले. मेडिकलमध्ये 107 दिवस तो व्हेंटिलेटरवर होता. अखेर त्याला वाचविण्यास मेडिकलच्या डॉक्टरांना यश आले. मुलाच्या आईवडिलांसाठी हा चमत्कारच होता.
गडचिरोलीच्या एका छोट्याशा गावातील होमराज (नाव बदललेले). मिरगीच्या आजारानं त्रस्त होता. लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाला. लहान भावाची व होमराजची जबाबदारी आईवर आलेली. ती माऊली खासगी काम करून त्याचे पालनपोषण करीत होती. 24 जुलै 2021 रोजी होमराजची प्रकृती खालावली.
आईने होमराजला गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तापाने तो फणफणत होता. संपूर्ण शरीरावर फोड आले होते. गडचिरोलीवरून डॉक्टरांनी त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यास सांगितले. सुरुवातीला दोन दिवस त्याला त्वचारोग विभागात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्यानं 29 जुलै 2021 रोजी त्याला मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 24 च्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
तिथे त्याला टिव्हन्स जॉन्सन सिन्ड्रोम्स व इतर आजार जडल्याचे निदान झाले. मेंदूच्या नसांमध्येही रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. मेडिसीन विभागातील आयसीयू इंचार्ज डॉ. मिलिंद व्यवहारे, डॉ. अर्चना अहेर, डॉ. अभिषेक पांडे, डॉ. रिया साबू, डॉ. श्रीजा खंडेलवाल, डॉ. सूरज हिवरकर, डॉ. सौरभ मेश्राम, डॉ. तुषार खडसे, डॉ. पूजा बोरलेपवार, डॉ. प्रज्ञा गावीत, डॉ. सौरभ शर्मा, डॉ. शीतल भरसाड या साऱ्या डॉक्टरांनी त्याच्यावर पाळत ठेवली. परिचारिका गीता कन्नाके यांच्यासह इतरांनी विशेष काळजी घेतली. मल्टिपल अँटिबायोटिक होमराजला दिले गेले. त्याला तो प्रतिसाद देऊ लागला. अशात डॉ. व्यवहारे व चमूंनी रुग्णाच्या खानपानावर लक्ष ठेवले. मोजक्या औषधी देऊन त्याला तब्बल १0७ दिवसानंतर म्हणजेच १२ नोव्हेंबर २0२१ रोजी व्हेंटिलेटरवरून काढले.
गडचिरोलीच्या होमराजला फिट येत होती. त्याच्या शरीरावर फोड जास्त झाल्यानं स्वसनाचा त्रास सुरू होता. फुफ्फुसावरही सूज येऊन पाणी जमा झाले होते. याचा किडनीवरही परिणाम दिसून आला. त्याचा रक्तदाब कमी झाला होता. उपचाराला प्रतिसाद दिल्यानं त्याला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढले. अशा घटना फार दुर्मिळ घडत असल्याचे मेडिसिन विभागाचे डॉ. मिलिंद व्यवहारे यांनी सांगितले.
Sharad Pawar | भाजपच्या गडात राष्ट्रवादीचं ‘मिशन विदर्भ’, शरद पवार चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘स्वाभीमानी’ आक्रमक; आजपासून तुपकरांचे बेमुदत उपोषण