नागपूर : 2011 ची जनगणना आणि 2019 मध्ये झालेल्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावरून नीती आयोगानं गरिबीचा निर्देशांक जाहीर केला. विदर्भातील अकरा जिल्ह्यांचा विचार करता नागपूर जिल्हा सर्वात श्रीमंत, तर यवतमाळ जिल्हा सर्वात गरीब जिल्हा ठरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 23.54 टक्के नागरिक गरीब असल्याचे नोंदविण्यात आले. तर नागपूर जिल्ह्यातील 6.72 टक्के नागरिक गरीब असल्याची नोंद आहे.
निर्देशांकात दर्शविण्यात आलेली गरिबी ही केवळ दरडोई उत्पन्नावर आधारित नाही. तर, उपलब्ध घरे, वीज जोडण्या, पाण्याची व्यवस्था, स्वयंपाकाच्या इंधनाची व्यवस्था, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सोयी, मृत्यूदर अशा निकषांवर आधारित हा निर्देशांक आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळं या जिल्ह्यात गरिबीचे प्रमाण जास्त आहे. त्यातही शहरी भागात सुविधा आहेत. पण, ग्रामीण भागात फारच कमी सुविधा असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट होते. त्यामुळं यवतमाळ जिल्ह्यात शाळा, दवाखाने, घरकुल, पाणीपुरवठा अशा विविध सुविधा राबविणे गरजेचे झाले आहे.
विदर्भात नागपूर जिल्हा हा सर्वात श्रीमंत जिल्हा आहे. कारण या जिल्ह्याचा गरिबीची निर्देशांक हा 6.72 आहे. भंडारा जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक 8.19, तर वर्धा जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक 8.82 इतका आहे. अमरावती जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक 12.24, तर अकोला जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक 13.38 आहे. या मानाने चंद्रपूर, बुलडाणा, गोंदिया, गडचिरोली, वाशीम हे जिल्हे आणखी गरीब आहेत. पण, यवतमाळच्या तुलनेत श्रीमंत आहेत. वाशीम जिल्ह्याचा गरिबीचा निर्देशांक 22.53, तर गडचिरोलीचा गरिबीचा निर्देशांक 20.57 इतका आहे.