नागपूर : यवतमाळात एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करा, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. यासह अन्य काही मागण्यांसाठी मेडिकल, मेयोच्या डॉक्टरांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. याचा रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे. दरम्यान, रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी डॉ. अशोक पाल यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात प्रशासनाकडून उदासीन धोरण राबविले जात असल्याचा आरोप मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी लावला. आरोपीला अटक करण्यात यावी आणि डॉ. पाल यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत करण्यात यावी, या मागणीसाठी मेडिकलचे विद्यार्थी तसेच निवासी डॉक्टर आक्रमक झालेत. राजनैतिक दबावामुळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. सजल बंसल यांनी केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी आंदोलनाच्या समर्थनार्थ कँडल मार्च काढण्यात येणार आहे.
रुग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डात सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, रुग्णासोबत फक्त एकाच नातेवाईकाला सोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी, रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात यावी, सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू ठेवण्यात यावेत, महाविद्यालय परिसरात स्ट्रीट लाईट लावण्यात यावेत, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. दरम्यान, आयसीयू, कोविड आयसीयू, लॅब, प्रसूती कक्ष येथील सेवा सुरू राहणार आहेत. निवासी डॉक्टरांनीही कामबंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचं डॉ. सजल बंसल यांनी सांगितलं.
अहमदनगर जिल्ह्यातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरत तीन परिचारिकांचे निलंबन करण्यात आले. या निलंबनाला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने विरोध केला आहे. निलंबित परिचारिकांना पूर्ववर सेवेत घेण्यात यावे, यासाठी शुक्रवारी (ता. 12) 1400 परिचारिकांनी काळी पट्टी बांधून सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला. दोन दिवसांत परिचारिकांना पूर्ववर सेवेत न घेतल्यास 15 नोव्हेंबरला नागपुरात कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
इतर बातम्या :
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट? मुंबई सेंट्रल आगारातून पहिली एसटी धावली; राज्यात 826 एसटी रस्त्यावर
नागपुरातली 16 ठिकाणं धोकादायक, प्रदूषणात झपाट्यानं वाढ, फुफ्फुसांच्या आजारांचा धोका वाढला?