गजानन उमाटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 08 नोव्हेंबर 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसेकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात घवघवीत यश मिळण्याचा दावा मनेसकडून करण्यात आला आहे. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे विदर्भात सभा घेणार असल्याचंही म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे ही निवडणूक कशी लढणार याचा प्लॅन मनसे नेते राजू उंबरकर यांनी सांगितला आहे. तसंच या निवडणुकीत जिंकण्याचा विश्वासही उंबरकर यांनी व्यक्त केला आहे.
मनसे नेते राजू उंबरकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहे, असं म्हणत राजू उंबरकर यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. तसंच या चार जागा मनसे जिंकेल, असंही उंबरकर म्हणाले आहेत.
चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघ, वाशिम लोकसभा मतदारसंघ, अमरावती आणि बुलढाणा मतदारसंघात मनसे आपले उमेदवार देणार आहे, असं उंबरकर म्हणालेत. काँग्रेसकडे असलेल्या चंद्रपूर – वणी लोकसभा मतदारसंघासाठी मनसेनं कंबर कसली आहे. खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातंही मनसे निवडणूक लढणार आहे. अमरावती आणि बुलढाणा मतदारसंघातही लढण्याची मनसेची तयारी आहे, असं राजू उंबरकर यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्या सभा गाजतात. निवडणूक काळात तर राज ठाकरे आपल्या भाषणाने विरोधकांचे वाभाडे काढतात. या सभांमुळे विरोधकांचे धाबे दणाणतात. या सभांमुळे मनसेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास राजू उंबरकर यांनी व्यक्त केला आहे. विदर्भात ज्या मतदारसंघात मनसे आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. त्या ठिकाणी राज ठाकरे दौरा करणार आहेत. राज ठाकरे विदर्भात सभा घेणार आहेत, असं राजू उंबरकर यांनी सांगितलं आहे.