नागपूर : मनपा निवडणुकीच्या कामाला लागा. माजी नगरसेवक, पक्षात काम करणारे माजी पदाधिकारी यांच्याशीही संपर्क वाढवावा. सर्वांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या. दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांशी बोलत होते.
दिवाळीनिमित्त रामदासेपेठेतील हॉटेलमध्ये भाजप पदाधिकार्यांचा स्नेहमीलन कार्यक्रम झाला. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, येत्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला भाजप कार्यकर्त्यांना लागावे लागेल. नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे. शहरात तीन सर्व्हे करून जनमताचा अंदाज घ्यावा. जनमताचा कल ज्यांच्या बाजूने लोक असतील त्यांनाच निवडणुकीत तिकीट द्यावे. अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्यावर अन्याय झाला, असे वाटते. मात्र त्यांनी प्रतिक्रिया न देता पक्षासोबत राहावे, असेही गडकरी म्हणाले.
अनेक कार्यकर्त्यांना आत्मविश्वास असतो. मात्र निवडणुकीचे निकाल वेगळे लागतात. त्यामुळे नेहमी नागरिकांसोबत राहावे, असेही गडकरी म्हणाले. चुकीच्या निर्णयामुळे अनेकदा दुसर्या पक्षाचे वा अपक्ष उमेदवार निवडून येतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून पक्षासाठी एकत्र यावे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नागपूर शहरातील आमदार व महानगरपालिकेने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहनही गडकरी यांनी केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून तीन सर्व्हे केले जावे. त्यात जनता ज्याच्या बाजूने असेल, त्याला तिकीट द्यावे, अशी सूचना नितीन गडकरी यांनी भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्यांना केली.
यावेळी खासदार विकास महात्मे, प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आमदार गिरीश व्यास, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, संजय भेंडे, माजी आमदार अनिल सोले, माजी महापौर संदीप जोशी, मनपा स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, अर्चना डेहनकर, संजय चौधरी, बाल्या बोरकर, राम अम्बुलकर, सुनील मित्रा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इतर बातम्या
नागपूर शहरात जमावबंदी लागू, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही