Nagpur Rain | नागपूरला जोरदार पाऊस, अनेक भागांमध्ये पाणी साचलं

| Updated on: Aug 19, 2023 | 7:16 PM

नागपुरात पावसाने आज जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. पावसामुळे रिंगरोड येथील एका बाजूची वाहतूक थांबवण्यात आली. विशेष म्हणजे हवामान विभागाने पुढच्या दोन दिवसांसाठी विदर्भासाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nagpur Rain | नागपूरला जोरदार पाऊस, अनेक भागांमध्ये पाणी साचलं
Follow us on

नागपूर | 19 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्रात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पाऊस काही ठिकाणी थोडाफार प्रमाणात पडत होता. पण मुसळधार पाऊस बघायला मिळत नव्हता. पावसाने आता मात्र पुन्हा कमबॅक करायचा निर्धार केला आहे. 15 ते 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा त्याचं मुसळधार असं रुप धारण करायला सुरुवात केली आहे. विदर्भ आणि नागपूरच्या नागरिकांना सध्या त्याचा प्रत्यय येताना दिसतोय. विदर्भात दोन दिवसांपासून काही भागांमध्ये पाऊस पडतोय. नागपुरात तर आज दुपारनंतर पाऊस जास्त वाढला. त्यामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचलं.

नागपुरात आज पावसाला सुरुवात झालीय. पावसाचं पाणी नरेंद्र नगर पुलाखाली साचलं आहे. पुलाखाली पाणी साचल्याने रिंगरोडमधील एका बाजूची वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली आहे. रिंगरोड परिसरात रस्त्याच्या शेजारी असलेल्या नाल्याला पूर आलाय. नागपुरात आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सखल भागांत पाणी साचलं. रिंगरोड परिसरात रस्त्यावर असलेलं पाणी पम्पिंग करुन नाल्यात टाकण्याचं काम सुरु आहे. पण सध्या तरी एका बाजूची वाहतूक बंद आहे.

मकरधोकडा तलाव ओव्हरफ्लो

नागपूर जिल्ह्यातील उमरेड जवळचा मकरधोकडा तलाव ओव्हरफ्लो झालाय. गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह परिसरात पावसाने हजेरी लावलीय. उमरेड परिसरात काल मुसळाधार पाऊस झालाय. त्यामुळे मकरधोकडा तलाव ओव्हरफ्लो झालाय. तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साह आहे.

मकरधोकडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने, परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. विदर्भात पावसाचा १५ दिवसांचा खंड पडला होता. पण गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झालीय. कापूस, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांना या पावसाचा फायदा होतोय.

पुढचे दोन दिवस महत्त्वाचे

पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. येत्या 2 दिवसात मराठवाड्यात आणि विदर्भात काही भागात मान्सून अधिक राहील, असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याची माहिती होसाळीकर यांनी दिलीय. त्यामुळे विदर्भासाठी पुढचे दोन दिवस जास्त महत्त्वाचे असणार आहेत.