नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झालेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या 16, तर पंचायत समितीच्या 31 जागांवर प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस, भाजप आणि शिवसेना गावागावात जोमाने प्रचार करत आहेत. काँग्रेसचे सुनील केदार, शिवसेनेचे आमदार आशिष जैस्वाल, तर भाजपकडून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रचाराची एकहाती धुरा सांभाळत आहेत. पाच ॲाक्टोबरला मतदान होणार असून शिवसेनेचा काँग्रेस विरोधात प्रचार सुरु आहे.
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूक ही ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्यानंतर होत आहे. त्यामुळे हाच मुद्दा घेऊन भाजप महाविकास आघाडी सरकारविरोधात प्रचार करत आहे. गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने नागपूर जिल्ह्यात विकासाचं एकही काम केलं नाही, असा आरोप करत भाजप केलेल्या विकास कामांवर मत मागत असल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
नागपूर जिल्ह्यात कुठल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोटनिवडणूक होणार?
तालुका – जिल्हा परिषद सर्कल
नरखेड – सावरगाव, भिष्णूर
काटोल – येनवा, पारडसिंगा
सावनेर – वाकोडी, केळवद
पारशिवनी – करंभाड
रामटेक – बोथिया
मौदा – अरोली
कामठी – गुमथळा, वडोदा
नागपूर – गोधनी रेल्वे
हिंगणा – निलडोह,
डिगडोह – इसासनी
कुही – राजोला
तिरंगी लढत
नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांवर शिवसेना पोटनिवडणूक लढवणार आहे. जिल्हा परिषदेच्या 12 सर्कलमध्ये शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत. आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर न दिल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळेल.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर ही निवडणूक होत आहे, त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला चांगलाच कस लागणार आहे. डिसेंबर 2019 च्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवरुन निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समित्यांच्या 31 सदस्यांचं सदस्यत्व निवडणूक आयोगाने रद्द केलं होतं. ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने आता खुल्या प्रवर्गातून निवडून येण्यासाठी ओबीसी उमेदवारांना चांगलाच कस लागणार आहे.
“म्हणून शिवसेना स्वबळावर लढणार”
शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी जून महिन्यातच दिली होती. “कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून सेना स्वबळावर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे” असं आशिष जैसवाल यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असं चित्र पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या :
नागपूर ZP पोटनिवडणूक : महाविकास आघाडी तुटल्यात जमा, शिवसेनेचे सर्व जागांवर उमेदवार
नागपुरात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु, राजकीय पक्षांना बंडखोरीची चिंता
अनिल देशमुख नॉट रिचेबल असल्याने कार्यकर्ते वाऱ्यावर, नागपुरात NCP चा वाली कोण?