नागपूर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनित देशमुख (Anil Deshmukh) आज तब्बल 21 महिन्यांनंतर नागपुरात (Nagpur) दाखल झालेत. अनिल देशमुख यांच्या आगमनामुळे नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारलाय. कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांचं जंगी स्वागत केलंय. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात देशमुखांचं नागपूर विमानतळावर स्वागत केलं. कार्यकर्त्यांचं प्रेम आणि स्वागत पाहून अनिल देशमुख चांगलेच भारावले. त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी अनिल देशमुख भावूक झालेले बघायला मिळाले.
“21 महिन्यांनंतर मी माझ्या नागपूर गावात येतोय. त्याचा मला अतिशय आनंद आहे. मला खोट्या गुन्ह्यात फसविण्यात आलं होतं. मला अतिशय आनंद होतोय. कार्यकर्ते इतके मोठ्या संख्येने आले आहेत. सगळ्यांना पाहून मला खूप आनंद होतोय”, असं अनिल देशमुख म्हणाले.
“माझ्या मुलाने वारंवार दौरे करुन मतदारसंघातीन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या संपर्कात राहिला. कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेले आहेत. त्यांचा उत्साह पाहून फार आनंद होतोय”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.
अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन पोलीस महासंचालकांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी घोटाळ्यांचा आरोप केला होता. याच आरोपांप्रकरणी अनिल देशमुख यांना अटक झाली होती. ते जवळपास 13 महिने जेलमध्ये होते.
अखेर कोर्टात वर्षभर युक्तिवादानंतर देशमुखांना कोर्टाने जामीन मंजूर केला होता. पण कोर्टाने त्यांना मुंबई सोडून बाहेर जाण्यास परवानगी नाकारली होती. पण त्यानंतर झालेल्या सुनावणीत अनिल देशमुख यांनी मुंबई सोडून नागपूर जाण्यासाठी परवानगी मागितली होती. कोर्टाने देशमुखांची ती परवानगी मान्य केली. त्यामुळे आज देशमुख नागपुरात दाखल झाले.
अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी एक जिप्सी फुलांनी सजवली आहे. याच जिप्सीने अनिल देशमुख यांची नागपूर विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत रॅली निघणार आहे.
विशेष म्हणजे या रॅलीनंतर अनिल देशमुख यांच्या घराजवळ त्यांचं आणखी जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्या घराबाहेर फुलांनी भरलेली क्रेन ठेवण्यात आली आहे. या क्रेनमधून अनिल देशमुख यांच्यावर पुष्पवृष्टी होणार आहे.
विशेष म्हणजे अनिल देशमुख नागपुरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड उत्साही झाले आहेत. कार्यकर्त्यांना इतका आनंद झालाय की, त्यांच्याकडून मिठाई आणि पेढे वाटले जात आहेत.