नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नागपुरात रविवारी नव्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या अनिल देशमुख (Anil Deshumukh) यांची चांगलीच चर्चा रंगली होती. अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान नुकतेच झाले होते. मात्र, तरीही अनिल देशमुख यांनी आजारपण बाजुला सारून या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षविस्तार अजेंडा फॉर्मात असल्याची चर्चा आहे. यावेळी अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधितही केले. (NCP leader Anil Deshumukh taking extra efforts for party)
अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत नागपुरातील ज्येष्ठ अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमापूर्वी अजित पवार यांची नागपुरात पत्रकारपरिषदही झाली. त्यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी आहे. तरीही आम्ही गृहमंत्रालयासारखं खातं विदर्भाला दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा आयोजित केला असून त्यांनी पहिल्या टप्प्याची सुरुवात विदर्भातून सुरु केली आहे. आतापर्यंत आठ जिल्हयामध्ये जयंत पाटील यांनी तालुका आणि विधानसभा मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका, भेटीगाठी घेतल्या आहेत. या दौऱ्यानिमित्त ठिकठिकाणी इतर पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यामुळे हा दौरा पक्ष संघटनेसाठी फलदायी ठरत असल्याची प्रतिक्रिया विदर्भातील नेते व्यक्त करत आहेत.
विधानपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील आपला बेस वाढवण्यासाठी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा‘ सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या यात्रेतून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत असून इतर पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला जात आहे. पक्षबांधणीसाठी राष्ट्रवादी आक्रमक झाल्याने आघाडीतही उलथापालथ सुरू झाली आहे.
आघाडीतील पक्षांनीही आपला बेस वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील खातेबदल करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. राज्यातील पाच महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आघाडीत ही उलथापालथ होत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.
संबंधित बातम्या:
मोठी बातमी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण
राष्ट्रवादीच्या ‘संवाद यात्रे’ने आघाडीत उलथापालथ?; वाचा स्पेशल रिपोर्ट!
(NCP leader Anil Deshumukh taking extra efforts for party)