नागपूर | 12 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा नागपुरात विधान भवनाजवळ धडकली. रोहित पवार यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते परिसरात दाखल झाले. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना अडवलं. पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात आले. पण कार्यकर्त्यांकडून बॅरिकेट्स तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला गेला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा झिरो माईल चौकावर पोहोचला. कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. तर पोलीसही सतर्क झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला. पोलिसांनी रोहित पवार यांनाही अडवलं आहे.
रोहित पवार यांच्या नेतृत्वातील युवा संघर्ष यात्रा ही राज्यभरात 800 किमीचा प्रवास करुन आज नागपुरात दाखल झाली. रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पायी चालत 400 गावांमधून ही युवा संघर्ष यात्रा केली. त्यांच्या या यात्रेचा समारोप आज नागपुरात झाला. नागपुरात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाषण केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आणखी काही महत्त्वाच्या नेत्यांनी भाषण केलं. त्यानंतर रोहित पवार यांची ही युवा संघर्ष यात्रा थेट विधान भवनाच्या दिशेला निघाली.
राष्ट्रवादीचे इतक्या मोठ्या संख्येतले कार्यकर्ते विधान भवनच्या दिशेला येत असल्याचं पाहिल्यानंतर पोलीस सतर्क झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात दाखल झाला. पोलिसांनी बॅरिकेट्स लावत कार्यकर्त्यांना अडवलं. कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटीलही सहभागी झाले. पोलिसांनी रोहित पवार यांना रोखलं. तसेच काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांकडून धरपकड सुरु झाल्यानंतर रोहित पवार यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी माध्यमांनी रोहित पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अरे हे सामान्य लोकांना सोडच नाहीत. “लाठीचार्ज करतात. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करतात. अरे शेतकऱ्यांची मुलं आहेत. गरिबाची मुलं आहेत. त्यांना तुम्ही लाठीचार्ज करत आहात. आम्ही काय म्हणतोय, शेतकऱ्यांचे, गरिबांचे, युवकांचे, स्पर्धा परीक्षांचे, बेरोजगारीचे, महिला सुरक्षेचे, आरोग्याचे प्रश्न सोडवा. याबद्दल चर्चा करु. बोलुया. पण त्यांना अहंकार आहे. तहसीलदारला पाठवतात, या शहराच्या भाजप अध्यक्षाला पाठवतात. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद नाही?”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.