नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी कारवाई, सतीश इटकेलवार आता काय भूमिका घेतील?

| Updated on: Jan 16, 2023 | 4:43 PM

नागपूर शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेले सतीश इटकेलवार (Satish Itkelwar) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली आहे.

नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी कारवाई, सतीश इटकेलवार आता काय भूमिका घेतील?
सतीश इटकेलवार
Follow us on

गजानन उमाटे, Tv9 मराठी, नागपूर : विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या (Shikshak-Padvidhar Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय. नाशिकमध्ये काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ताजी असताना नागपुरातून एक मोठी बातमी समोर आलीय. नागपूर शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेले सतीश इटकेलवार (Satish Itkelwar) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली आहे. सतीश इटकेलवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून आधीच अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे. असं असताना सतीश इटकेलवार यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सतीश इटकेलवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण महाविकास आघाडीकडून या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराला अधिकृत पाठिंबा देण्यात आलाय. त्यामुळे सतीश इटकेलवार यांना अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली होती. पण इचकेलवार यांनी अर्ज मागे घेतला नाही. याउलट ते नॉट रिचेबल झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली.

नागपुरात महाविकास आघाडीचे तब्बल तीन नेते

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आता महाविकास आघाडीचे तब्बल तीन उमेदवार मैदानात असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ओबीसी सेलचे नेते सतीश इटकेलवार यांना अर्ज मागे घेण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले होते. त्यानंतर इटकेलवार यांनी ‘टीव्ही ९ मराठी’सोबत बोलताना आपण अर्ज मागे घेणार असल्याची भूमिका मांडली होती. पण त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले होते. ते अर्ज मागे घेण्यासाठी परत गेले नाहीत. त्यामुळे ते निवडणुकीच्या मैदानात आहेत, हे स्पष्ट आहे.

नागपुरात तिहेरी लढत

नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे हे सुद्धा उमेदवार आहेत. त्यांनीदेखील अर्ज मागे घेतलेला नाही. तिसरे म्हणजे सुधाकर अडबाले यांनी देखील अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीत सतीश इटकेलवार, राजेंद्र झाडे आणि सुधाकर अडबाले यांच्यात तिहेरी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय.

नाशिकमध्ये दुहेरी लढत

नागपूर पाठोपाठ नाशिकमध्येही प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. विशेष म्हणजे त्या कालपासून नॉट रिचेबल होत्या. अखेर अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर त्या विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात दाखल झाल्या. यावेळी त्यांनी आपण अर्ज मागे घेतला नसल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं. त्यामुळे या निवडणुकीत सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी दुहेरी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय.