नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या नंबरचा पक्ष आहे. विदर्भातील 62 विधानसभा जागांपैकी राष्ट्रवादीचे सध्या अवघे सहा आमदार आहेत. 2014 ला तर आणखीच दयनीय स्थिती होती, अवघा एक आमदार निवडून आला होता. ही सल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मनात कायम राहीली, त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन, राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील सर्व 62 मतदारसंघात आपले पाय रोवण्यास सुरुवात केलीय. नुकताच अमरावतीत ( Amravati) पार पडलेला संवाद कार्यक्रम याचीच सुरुवात असल्याची जोरात चर्चा आहे.
विदर्भात आतापर्यंत आघाडीत आमचे 70 टक्के कार्यकर्ते उभे राहू शकले नाही. आघाडी करुन विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात एक नाही तर दोन जागा लढवल्या, यात बदल करण्याची गरज आहे. आपली ताकद वाढलीय. जिथे कधीच निवडणुक लढलो नाही, तिथे आपली मोठी ताकद. भविष्यात या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताकद देणार” असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांनी विदर्भातील 62 विधानसभा जागांवर कामाला लागण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना नुकतेच दिले.
राष्ट्रवादीच्या मिशन विदर्भ अंतर्गत मे महिन्यात गडचिरोलीपासून राष्ट्रवादीचा संवाद दौरा होणार आहे, शिवाय स्वतः शरद पवार लवकरंच विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं दोन दिवसांचं शिबिर घेणार आहेत. यावरुन वेळ आलीच तर विदर्भातील 62 जागांवर उमेदवार देता येईल, जास्तीत जास्त जागा जिंकता येतील, अशी तयारी राष्ट्रवादी करत असल्याचं दिसतेय. असं एकंदरित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बोलण्यातून वाटते. विदर्भात आतापर्यंत न लढलेल्या विधानसभा क्षेत्रावर राष्ट्रवादीची नजर राहणार आहे. विदर्भातील 62 जागांवर संघटन मजबुतीसाठी लक्ष ठेवण्यात आलंय. पश्चिम विदर्भात शरद पवार घेणार शिबिर घेणार आहेत. न लढलेले मतदारसंघ मजबूत करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेत.
शेखर सावरबांधे हे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आहेत. माजी उपमहापौर असलेल्या सावरबांधे यांनी काल विकासाची पंचसुत्री या विषयावर महाराज बाग चौकातील प्रेस क्लबमधील कन्व्हेंशन हॉल येते मार्गदर्शन केले. राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी विकासाची कशी पंचसुत्री सांगितली. असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. एकंदरित नागपूर महापालिका तसेच विधानसभेच्या तयारीसाठी राष्ट्रवादीनं या माध्यमातून राष्ट्रवादीचा प्रचार सुरू केला आहे.