‘त्या’ डायरीतून मोठे खुलासे होणार? गडकरी यांना धमकावणाऱ्या कैद्याकडे सापडली डायरी; नागपूर पोलीस कर्नाटकात दाखल

| Updated on: Jan 15, 2023 | 1:57 PM

जयेश पुजारी हा 2016मध्ये तुरुंग तोडून पळून गेला होता. यापूर्वीही त्याने तुरुंगातून अनेक अधिकारी आणि इतरांना धमकावले आहे. जयेश पुजारी याने गडकरींना धमकीचा फोन का केला?

त्या डायरीतून मोठे खुलासे होणार? गडकरी यांना धमकावणाऱ्या कैद्याकडे सापडली डायरी; नागपूर पोलीस कर्नाटकात दाखल
nitin gadkari
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कर्नाटकातील हिंडलगा तुरुंगातून धमक्याचे फोन आल्याचं उघड झालं आहे. जयेश पुजारी या गँगस्टरने तुरुंगातून धमकीचे फोन केल्याचं उघड झाल्यानंतर नागपूर पोलिसांची टीम कालच कर्नाटकात पोहोचली. पोलिसांनी हिंडलगा तुरुंगात जाऊन जयेश पुजारी याची कसून चौकशी सुरू केली आहे. तसेच त्याच्याकडील एक डायरीही जप्त करण्यात आली आहे. या डायरीतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मध्यरात्री दोन तास या तुरुंगाचा प्रत्येक कोपरा न् कोपरा शोधून काढला असून अजूनही पोलिसांचा तपास सुरू आहे.

नितीन गडकरींना धमकीचा फोन आल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बेळगावातील हिंडलगा जेलमध्ये नागपूर पोलीस शनिवारी रात्री दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गडकरींना शनिवारी सकाळी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलीस खात्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून नागपूर पोलीस बेळगावात दाखल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

दोन तास तपासणी

कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव पोलीस नागपूर पोलिसांना तपासात मदत करत आहेत. शनिवारी रात्री दोन तासाहून अधिक वेळ जेलमध्ये शोध मोहीम राबवण्यात आली. आजही पुन्हा जेलमध्ये शोध मोहीम राबवून तपास करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पोलिसांनी यावेळी जयेश पुजारीकडून एक डायरी जप्त केली आहे. या डायरीत नेमकं काय लिहिलंय? कुणाची नावे आहेत का? कुणाचे फोन नंबर आहेत का? या डायरीत गुन्हेगारी जगताशी संबंधित काही माहिती आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.

दहा मिनिटात तीन कॉल

विशेष म्हणजे गडकरी यांच्या कार्यालयात अवघ्या 10 मिनिटात तीन वेळा धमकीचा फोन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या फोन कॉलची गंभीर दखल घेऊन तातडीने शोध मोहीम हाती घेतली. त्यानंतर हिंडलगा तुरुंगातून जयेश पुजारी यानेच गडकरी यांना फोन केल्याचं उघड झालं.

तुरुंगातून पळाला होता

जयेश पुजारी हा 2016मध्ये तुरुंग तोडून पळून गेला होता. यापूर्वीही त्याने तुरुंगातून अनेक अधिकारी आणि इतरांना धमकावले आहे. जयेश पुजारी याने गडकरींना धमकीचा फोन का केला? त्यामागे तो एकटाच आहे की अंडरवर्ल्डचा एखादा मोठा गुन्हेगारही आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

दाऊदचा हस्तक असल्याचं सांगून गडकरी यांच्याकडे 100 कोटींची खंडणी मागण्यात आली. या फोन कॉलनंतर कालपासून गडकरी यांचं घर आणि कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.