नागपूर : मनपातील स्टेशनरी घोटाळ्याप्रकरणी (NMC scam) आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. घोटाळ्याशी संबंधित फाईल्सचा शोध घेतला असता त्या कंत्राटदाराकडं सापडल्या. कंत्राटदाराकडून (contractors) त्या फाईल्स वित्त विभागात पाठविण्यात आल्या. पण, फाईल्स कंत्राटदाराकडं कशा आल्या असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सामान्य प्रशासन व वित्त विभागात फाईल्स दडविण्याचा प्रकार घडला.
या घोटाळा प्रकरणी एजन्सीचे मालक पद्माकर साकोरे, सुषमा साकोरे, मनोहर साकोरे, अतुल साकोरे या चौघांविरोधात मनपाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. शुक्रवारी अतुल मनोहर साकोरे व कोलबा जनार्दन साकोरे या दोघांना अटक करण्यात आली होती. तर रविवारी मनपाच्या सामान्य प्रशासन विभागातील ऑडिटर अफाक अहमद आणि लिपिक मोहन रतन पडवंशी या दोघांना त्यांच्या घरातूनच अटक करण्यात आली. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या चौकशीतून ऑडिटर आणि लिपिकाची नावे समोर आली. मोहन याने घोटाळ्याची फाईल मनपाच्या पुरवठ्यासंदर्भातील संकेतस्थळावर अपलोड केली होती. तर अफाक याने कोणत्याही चौकशीशिवाय ती फाईल मंजूर केली. आणखी तपास सुरू असून, त्यातून मनपातील आणखी कर्मचार्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
साकोरे यांनी आरोग्य विभागात 67 लाख रुपयांची 41 बोगस कंत्राटे तयार करून घोटाळा केल्याचे उघडकीस आले. 13 डिसेंबरला मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात पाच कंपन्यांविरोधात तक्रार केली. 14 डिसेंबरला साकोरे यांनी 67 लाख रुपये मनपाकडे जमा केले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे यांच्यासह सहाजणांना नोटीस बजावण्यात आली. ग्रंथालय आणि जन्मृ-मृत्यू नोंदणी विभागातील बोगस कंत्राटे समोर आली. अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. 16 डिसेंबरला पुरवठा दारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 17 डिसेंबरला दोन पुरवठादारांना अटक करण्यात आली. मनपाने आठ कंपन्यांना काळ्या यादीत टाकले. 19 डिसेंबरला मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.
महापालिकेच्या विविध विभागांना मनोहर साकोरे व त्यांच्या नातेवाईकांच्या फर्मच्या माध्यमातून स्टेशनरीचा पुरवठा केला जातो. यात मनोहर साकोरे अँण्ड कंपनी, स्वस्तिक ट्रेडिंग, गुरुकृपा स्टेशनरी, एस.के. एन्टरप्रायजेस व सुदर्शन आदी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी आरोग्य विभागाला कोविड कालावधीत साहित्याचा पुरवठा न करता बिल उचलण्यात आल्याचा प्रकार आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या निदर्शनास आला होता. 20 डिसेंबर 2020 ते 21 मार्च 2021 या कालावधीत विविध विभागांना स्टेशनरी साहित्याचा पुरवठा न करता 67 लाखांची बिले उचलण्यात आल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे या पाचही एजन्सी एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाने आहेत.