नागपूर : नागपूरच्या तहसील पोलिसांनी एकदोन नाही तर चक्क 8 गाड्या चोरणाऱ्या आरोपी हर्ष खोत याला एका प्रकरणात अटक केली. त्याने वेगवेगळ्या भागातून गाड्या चोरी केल्या होत्या. एका चोरीच्या प्रकरणात संशयित म्हणून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सार बिंग फुटलं. मात्र एवढ्या गाड्या त्याने का चोरी केल्या हे जाणून पोलीसही हैराण झाले.
हर्ष खोतला फक्त आपले शौक पूर्ण करण्यासाठी पैसे पाहिजे होते म्हणून तो त्यासाठी गाड्या चोरी करायचा. त्या विकून पैसे मिळवायचे आणि आपले शौक पूर्ण करायचे बस्स. मात्र त्याचे शौक त्याला आता जेलपर्यंत घेऊन पोहचले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 8 गाड्या जप्त केल्या. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेत असल्याचं तहसील ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी सांगितलं.
वर्धमाननगर पोलीस ठाणे निवासी पूनम अग्रवाल (39) गांधीबाग येथे आल्या होत्या. बँक ऑफ बडोदा येथे आपली अॅक्टिव्हा ठेवली होती. काम करून परत आल्यानंतर पाहतात तर काय अॅक्टिव्हा गाडी गायब. त्यांच्या जीवाचा ठोकाच चुकला. गाडी कुठे गेली, असेल, याबाबत आजूबाजूला विचारणा केली. त्यानंतर तहसील पोलिसांत तक्रार दाखल केली.
बांग्लादेश जुना पाचपावली निवासी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार हर्ष सुधाकर खोत (वय 22) संशयास्पद दिसला. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यातील अॅक्टिव्हा गाडी सापडली. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. महिन्याभरापूर्वी चोरीला गेलेली गाडी त्याच्याच ताब्यात मिळाली. त्याच्या घराच्या अंगणात इतर सहा गाड्या दिसल्या. अशाप्रकारे एकूण आठ गाड्या हर्षकडून जप्त करण्यात आल्या. दोन लाख 35 हजार रुपये किंमत आहे. त्याची गँग आहे का आणि चोरीस गेलेल्या गाड्या तो कुणाला विकत होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.