नागपूर : जिल्ह्यातील पाचपवली येथे एक अजब घटना घडली आहे. येथे असलेल्या क्वारंटाईन सेंटरमधून चहा विकणाऱ्या विक्की उंदिरवाडे नावाच्या युवकाने चक्क पंखे, विजेचे बल्ब तसेच नळाच्या तोट्या चोरल्या आहेत. कोरोना सेंटर असो किंवा क्वारंटाईन सेंटर या ठिकाणी जाण्याचे लोक टाळतात. मात्र, या विक्की नावाच्या तरुण चोराने थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊन चोरी केली आहे. त्याच्या याच धाडसामुळे सगळे चक्रावले आहेत. (Police arrested young man who stole fan light bulb from Nagpur Pachpaoli quarantine centre)
मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील पाचपवली येथे एक क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरच्या बाजूलाच विक्की उंदिरवाडे नावाचा एक तरुण चहा विकायचा. मागील कित्येक दिवसांपासून चहा विकत असल्यामुळे त्याला आजूबाजूच्या परिसराची चांगलीच माहिती होती. त्याने क्वारंटाईन सेंटरच्या इमारतीचीसुद्धा माहिती घेऊन ठेवली होती. त्यांतर योग्य ती संधी साधून तो क्वारंटाईन सेंटरच्या इमारतीमध्ये प्रवेश करायचा. तसेच तिथे जाऊन चोरी करायचा.
असा प्रकारे मागील काही दिवसांपासून या इमारतीत चोरीचे अनेक प्रकार समोर आले होते. क्वारंटाईन सेंटरच्या इमारतीमधील एक किंवा दोन नाही तर चक्क 23 पंखे चोरी केले होते. सोबतच नळाच्या तोट्या आणि विजेचे बल्ब गायब होते. असे प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध घेण्याचे ठरवले आणि तपास सुरु केला. मात्र, पोलिसांना यामध्ये यश येत नव्हते. पोलिसांना धागेदोरे सापडत नव्हते.
मात्र, एका दिवशी विक्की उंदिरवाडे हा युवक आपल्या बॅगमध्ये पंखा घेऊन जात असल्याचं पोलिसांना दिसलं. तसेच तो संशयित पद्धतीने वावरत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान विक्की उंदिरवाडे या तरुणाने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 23 पंखे आणि इतर वस्तू हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, या तरुणाच्या अजब चोरीमुळे सगळेच चक्रावले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
इतर बातम्या :
दिलासादायक ! नागपूर सावरतंय, दिवसभरात 319 नवे रुग्ण, मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट
Nagpur Corona New Rules | नागपुरात रुग्णसंख्येत घट, 1 जूनपासून नवी नियमावली, काय बंद काय सुरु ?
(Police arrested young man who stole fan light bulb from Nagpur Pachpaoli quarantine centre)