अकोला | 3 मार्च 2024 : महाविकास आघाडीसोबत आपली युती झालेली नाही. त्यामुळे माझ्या आदेशाशिवाय महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका, असं खळबळजनक आवाहन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडालेली असतानाच आंबेडकर यांनी आणखी एक खळबळजनक विधान केलं आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आघाडीत काहीच अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आज पुन्हा एकदा बॉम्बगोळा टाकला आहे. 48 पैकी 15 जागांवरील उमेदवार ओबीसीतील असावेत. किमान तीन उमेदवार अल्पसंख्याक समाजाचे असावेत, असं आमचं म्हणणं आहे. त्यावर अजून फैसला झालेला नाही. तसेच काही घटक पक्षांनी भाजपसोबत जाणार नाही हे आताच स्पष्ट केलं पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
मीडियाने दिलेल्या माहितीवरून काँग्रेस आणि शिवसेनेत 15 जागांवरून वाद आहे. तर एनसीपीमध्ये 9 जागांवरून वाद आहे. सहा तारखेपर्यंत हा वाद मिटणार असेल तर स्वागत आहे, असं सांगतानाच आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडीसोबत राहण्याचा प्रयत्न करू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आघाडीचा मसुदा असला पाहिजे. आपलं मत सेक्युलर आघाडीला आहे. आणि हे मत सेक्युलरच राहील हे मतदाराला वाटलं पाहिजे. आता यावर महाविकास आघाडीवर काय भूमिका घेते याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडी 40 जागा जिंकू शकते असं मी मागे म्हणालो होतो. आम्ही किती जागा जिंकू शकतो असं मीडियाने विचारलं, तेव्हा आम्ही किमान सहा जागा जिंकू असं म्हटलं होतं. ही निवडणूक भाजप विरुद्ध वंचित अशीच लढाई होताना दिसत आहे. आम्ही वेगळे लढलो तर कुणाच्या किती जागा पडतील यापेक्षा आम्हाला किती मिळतील हे महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले.
आधीच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युती होती. तेव्हा भाजप 23 जागा लढत होती. गेली 20 वर्ष भाजप इतर जागांवर लढली नाही. काँग्रेस आणि एनसीपीही 2004पासून एकत्र लढत आहेत. त्यांच्या सीट शेअरिंगचा फॉर्म्युला तोच आहे. ज्या मतदारसंघात काँग्रेस लढली नाही, तिथे काँग्रेसला वाव नाही. तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादी लढली नाही, तिथे राष्ट्रवादीलाही संधी नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सेटलमेंट करा असं आम्ही म्हटलंय, अशी माहिती त्यांनी दिली.