नागपूर | 25 डिसेंबर 2023 : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा अजूनही इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 48 जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काहीच होत नसेल तर आम्ही लोकसभेच्या 48 जागा मोठ्या ताकदीने लढवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी कालच सांगितलं होतं. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय अंडरस्टँडिंग झाली होती, याचा गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्रकाश आंबेडकर आज नागपुरात आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठरलेलं सिक्रेटही सांगितलं. उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे. आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे. शिवसेने आणि काँग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर शिवसेना आणि वंचितने 50-50 जागा लढवण्याचं आमच्या ठरलं आहे. म्हणजे लोकसभेच्या 24 जागा उद्धव ठाकरे आणि 24 जागा आम्ही लढणार असं मोघम ठरलं होतं. आमच्यात ही मोघम अंडरस्टँडिंग झाली आहे, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला.
महाविकास आघाडीचं काहीच झालं नाही तर मग आम्ही फिफ्टी-फिफ्टी लढू. त्यांचं जागा वाटप ठरलं तर मग फॉर्म्युला वेगळा येतो. काहीच झालं नाही आणि सर्वांनी वेगळं लढायचं ठरलं तर राजकीय पक्ष म्हणून आम्हालाही लढावं लागले. आम्हीही 48 जागा लढवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
दरम्यान, नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानात वंचित बहुजन आघाडीची आज ‘स्त्री मुक्तीदिन परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. ही सभा सुरू होण्यापूर्वीच सभा मंचामागील बॅनर असलेला पिलर कोसळला. त्यामुळे मंचावरील मागच्या बाजूला असलेले बॅनर खाली पडले आहेत. सुदैवाने घटनेत कुणीही जखमी नाही.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी इंडिया आघाडीवर भाष्य केलं आहे. युती झाल्याचं भासवून फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा परिणाम थेट ठाकरे गटाला दिसेल. प्रकाश आंबेडकर यांना झुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आंबेडकर महाविकास आघाडीला जागा दाखवतील. आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं, त्यांचं रेड कार्पेट टाकून स्वागत करू, असं संजय शिरसाट म्हणाले.