नागपूर : स्थळ नागपूर येथील रेल्वेस्थानक. सकाळी साडेपाच वाजताची घटना. रेल्वेगाडी बिहारवरून नागपूरला आली. प्रेमीयुगुल नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. आता त्यांना दुसऱ्या गाडीची वाट पाहावी लागत होती. दुसरी रेल्वेगाडी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी निघणार होती. त्यामुळं दोघेही फलाट क्रमांक एकवर सिमेंटच्या बाकावर बसले होते. आरपीएफ जवान अतुल सावंत (Atul Sawant) यांच्या ही बाब लक्षात आली. मुलगी अल्पवयीन असल्याचं अतुल यांच्या लक्षात आलं. त्यांनी दोघांचीही विचारपूस केली. त्यांनी आपली प्रेमकहाणी (Love Story) सांगितली. पण, मुलगी अल्पवयीन (Girl minor) असल्यानं पोलिसांना योग्य ती कारवाई करावी लागली.
ही मुलगी बारावीत शिकते. तर तिचा प्रियकर दहावीपर्यंत शिकलेला. शाळेपासून त्यांची मैत्री. पण, तो रोजगारासाठी बाहेरगावी गेला. तो तामिळनाडूत एका कंपनीत काम करतो. तो तिकडं गेला तरी त्यांची मैत्री कायम होती. ही बाब तिच्या घरच्यांच्या लक्षात आली. नेहमीचं त्यांचं काय ते बोलणं-चालणं काही खरं वाटत नव्हतं. पोरीचं बारावीचं वर्ष. म्हणून अभ्यासाकडं लक्ष दे, असे घरचे लोकं सांगत होते. पण, तिला प्रेमाची नशा चढली होती. घरच्यांसोबत तिचे भांडण झाले. तिने थेट आपल्या प्रियकराला फोन केला. तो तामिळनाडूवरून तिला घेण्यासाठी बिहारला गेला.
तिने तयारी केली. घरच्यांना न सांगता निघून आली. बिहारमधून रेल्वेने ते दोघे नागपूरपर्यंत आले. इथून दुसऱ्या रेल्वेने त्यांना तामिळनाडूत जायचं होतं. गोरखपूर-यशवंतपूर एक्सप्रेसने तामिळनाडूला जाण्यासाठी निघाले. मध्यंतरी नागपुरात थांबा दिला. त्याठिकाणी त्यांचं प्लॅनिंग भसकलं. मुलगी अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी तिच्या आईवडिलांना फोन केला. मुलाला रित्या हाताने परत जावे लागले. तिचीही निराशा झाली. एकंदरित, प्रियकर-प्रेयसी दोघेही बिहारचे. पळून जाण्याचा बेत ठरला. पण, प्रवासात नागपुरात थांबले. रेल्वेतील आरपीएफच्या हे लक्षात आले. मुलगी अल्पवयीन असल्यानं त्यांची प्रेमकहाणी अधुरीच राहिली.